ब्रेकींग : एकनाथ शिंदे बनणार मुख्यमंत्री

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भाजपच्या पाठींब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनणार असल्याची घोषणा आज फडणवीस यांनी केली आहे.

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी पहिल्यांदा फडणवीस यांची त्यांच्या सागर या निवासस्थानी भेट घेतली. यानंतर या दोन्ही मान्यवरांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली. याप्रसंगी नव्या सरकारसाठी आवश्यक असणार्‍या संख्याबळाचा पुरावा म्हणून त्यांना आमदारांच्या पाठींब्यांचे पत्र प्रदान करण्यात आले. राज्यपालांनी भावी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. यानंतर फडणवीस आणि शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली.

याप्रसंगी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, २०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या युतीला स्पष्ट बहुमत मिळाले होते. अपक्षांसह आम्हाला १७० आमदारांचे पाठबळ होते. यामुळे साहजीकच युतीचे सरकार होईल अशी अपेक्षा होती. याप्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी भाजपचे मुख्यमंत्री बनतील अशी घोषणा केली होती. मात्र निकालानंतर, शिवसेनेच्या नेत्यांनी वेगळा मार्ग निवडला. त्यांनी हिंदुत्वाचा विरोध करणार्‍या कॉंग्रेस व राष्ट्रवादीला सोबत घेतले हे जनमताचा अपमान होता. यानंतर नेहमीच हिंदुत्वाचा अपमान करण्यात आला. दाऊदशी संबंधीत असलेला मंत्री जेलमध्ये जाऊन देखील त्याला काढण्यात आले नाही. जाता-जाता नामांतर केले असून त्याला आमचे समर्थनच असल्याचे फडणवीस म्हणाले.

फडणवीस पुढे म्हणाले की, शिवसेनेच्या आमदारांची मोठी कुचंबणा होती. ज्यांच्याशी लढलो आणि पुढे देखील ज्यांच्याशी लढायचे आहे त्यांची सोबत कशासाठी अशी त्यांची भावना होती. मात्र उध्दवजींनी आमदारांचे न ऐकता कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची सोबत ठेवली. के सरकार कधीही पडणार असल्याचे मी सातत्याने सांगत होतो. लोकांवर निवडणुका लादणार नसल्याचेही आम्ही सांगत होतो. यामुळे भाजप, शिंदे यांचा शिवसेना विधीमंडख गट आणि १६ अपक्ष यांचे पत्र आम्ही राज्यपालांना दिले आहे. याप्रसंगी त्यांनी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे जाहीर केले.

याप्रसंगी फडणवीस म्हणाले की, सायंकाळी साडे सात वाजता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. ते एकटेच मुख्यमंत्री बनणार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या गटाने त्यांना पूर्णपणे समर्थन दिले आहे. मी स्वत: या मंत्रीमंडळात राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असून यात भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या तसेच काही अपक्ष मंत्र्यांचाही समावेश असेल अशी माहिती त्यांनी दिली. आपण बाहेर राहणार असून हे सरकार चांगले चालावे यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनी याप्रसंगी दिली.

Protected Content