जळगाव प्रतिनिधी । भाजपाचे केंद्रीय कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्याशी माझे नुकतेच बोलणे झाले असून पक्षातील नाराजीबद्दल माझे म्हणणे ऐकूण घेण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाने दिल्ली येथे बोलावले आहे. अशी माहिती माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज दि.26 रोजी येथील लेवा एज्युकेशन संस्थेच्या शताब्दी महोत्सव समारंभात पत्रकारांशी बोलताना दिली.
ते म्हणाले की, गेल्या विधानसभा निवडणुकीत मला मिळालेली वागणूक आणि पक्षातील काही विरोधकांनी माझ्याविरूध्द घेतलेली भूमीका याबाबतीत मी वेळोवेळी राज्यपातळीवरील नेतृत्वाशी चर्चा केली होती. त्यातच चार दिवसांपुर्वी माझी याचसंदर्भात श्री. नड्डा यांच्याशीही चर्चा झाली त्यावेळी त्यांनी मला दिल्ली येथे येण्याचे सांगितले आहे.
यात पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांना दिल्लीत बोलावून त्या संदर्भात चर्चा करुन माहिती घेतली जाईल आणि त्यानंतर दोषी असलेल्यांवर योग्य ती शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असे आश्वासन मला देण्यात आले आहे. ज्यावेळी शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, त्यावेळेस आपण समाधानी होऊ, असेही श्री. खडसे यावेळी म्हणाले.