चोपडा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील वराड येथील आदिवासी भिल्ल समाजातील नागरिकांवर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून झालेल्या अन्याय आणि अत्याचाराविरोधात एकलव्य भिल्ल समाज संघटना, महाराष्ट्र राज्य, बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्याची मागणी करत संघटनेने प्रशासनाला निवेदन दिले आहे. न्याय न मिळाल्यास कायदेशीररित्या तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदकांनी दिला आहे.
निवेदनानुसार, चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नान्हेडा यांनी वराड येथील आदिवासी भिल्ल समाजातील तरुणांवर आणि एका महिलेवर अमानुषपणे मारहाण केली. धक्कादायक बाब म्हणजे, त्यांनी तीन तरुणांना लैंगिक छळ करण्यास आणि किळसवाणे कृत्य करण्यास भाग पाडले, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ही घटना २३ जुलै २०२५ रोजी घडल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

गुन्हा दाखल करण्याची मागणी
या सर्व घटनांबाबत २३ जुलै २०२५ रोजी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये नान्हेडा (PSI) आणि इतर पोलीस शिपाई यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी तक्रार देण्यात आली होती. मात्र, अद्यापपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, अशी तक्रार संघटनेने केली आहे. पीडित आदिवासी समाजाचे असूनही, गुन्हेगारांनी जबर मारहाण आणि शारीरिक-लैंगिक अत्याचार करून मानवाधिकार कायद्याचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे या क्रूर कृत्याबद्दल दोषींवर कलम ३(१), कलम ३५४ नुसार ॲट्रोसिटी ॲक्ट आणि मानवाधिकार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अधीक्षक कार्यालयातही तक्रार दाखल
यापूर्वी २५ जुलै २०२५ रोजी पोलीस अधीक्षकांकडेही तक्रार अर्ज केला होता, परंतु आजपर्यंत त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही, असेही निवेदनात म्हटले आहे.
प्रमुख मागण्या:
आदिवासी भिल्ल समाजातील महिलेला पट्ट्याने मारहाण करून अश्लील शिवीगाळ करत अमानुष वागणूक दिल्याप्रकरणी नान्हेडा (PSI) आणि घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी निलंबित करून ॲट्रोसिटी ॲक्टनुसार गुन्हा नोंद करावा. वराड गावातील आदिवासी भिल्ल समाजातील तरुणांवर अमानुष मारहाण आणि लैंगिक छळ करण्यास भाग पाडल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नान्हेडा (PSI) आणि इतर पोलीस शिपाई यांच्यावर ॲट्रोसिटी ॲक्टनुसार गुन्हा नोंद करून त्यांना कायमस्वरूपी निलंबित करावे.
एकलव्य भिल्ल समाज संघटनेने प्रशासनाला या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन न्याय देण्याची मागणी केली असून, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.



