यावल–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । संपूर्ण जगभरात ९ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणारा जागतिक आदिवासी दिन यंदा यावलमध्ये विशेष उत्साहात साजरा केला जाणार आहे. यावेळी टोकरे कोळी, भिलाला, बारेला व पावरा या आदिवासी जमातीचे बांधव एकत्र येऊन सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवणार आहेत. या कार्यक्रमाच्या तयारीसाठी यावल येथील जिनिंग प्रेसिंग सोसायटीच्या सभागृहात सर्व समाज बांधवांची संयुक्त बैठक नुकतीच पार पडली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अंजाळे येथील माजी सरपंच यशवंत सपकाळे (पहलवान) होते. बैठकीत आदिवासी दिनाचे आयोजन एकात्मतेने, सन्मानाने आणि सांस्कृतिक अभिमानाने साजरे करण्याच्या दृष्टीने विविध निर्णय घेण्यात आले. कार्यक्रमाच्या पूर्वतयारी अंतर्गत, ९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता मनू माता मंदिर (फैजपूर रोड, यावल) येथून एकत्रितपणे रॅली काढण्यात येणार असून, सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

बैठकीत उत्सव समितीचे अध्यक्ष नितीन सपकाळे, वढोदा गावाचे सरपंच संदीप सोनवणे, उपाध्यक्ष विजय सपकाळे, तसेच मुकेश कोळी, खेमचंद कोळी, भारत साळुंके, नरेंद्र कोळी, हिरालाल कोळी, बिराम बारेला, फुलसिंग बारेला, विजय बारेला, दिनेश बारेला, अनिल बारेला, गोकुळ कोळी, महेश बारेला आणि अनेक समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या बैठकीत आदिवासी समाजाच्या एकतेचा, सांस्कृतिक ओळखीचा आणि संविधानिक हक्कांचा जागर करण्यावर भर देण्यात आला. जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने समाजात बंधुभाव, शिक्षण, रोजगार आणि आरोग्याबाबत जनजागृती वाढविणे हे या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट असणार आहे.
हा दिवस फक्त उत्सवापुरता मर्यादित न ठेवता, तो सामाजिक आत्मभान, हक्कांची जाणीव आणि पुढच्या पिढीला प्रेरणा देणारा ठरावा, यासाठी यंदा यावलमध्ये आदिवासी बांधवांनी पुढाकार घेतला आहे. एकत्र येऊन सांस्कृतिक अस्तित्वाचे दर्शन घडवण्यासाठी यावलकरांनी सज्ज होण्याचे संकेत दिले आहेत.



