मुंबई-वृत्तसेवा | माजी मंत्री तथा शरद पवार गटाचे आमदार एकनाथराव खडसे यांनी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून यामुळे ते भाजपमध्ये परतणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी काही महिन्यांपासून भारतीय जनता पक्षात पुन्हा प्रवेश करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा व भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली होती. याप्रसंगीच त्यांचा भाजपमधील प्रवेश निश्चीत झाल्याचे मानले जात होते. मात्र अनेक दिवस उलटून देखील यावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले नव्हते. खुद्द नाथाभाऊंनी वरिष्ठांनी होकार दिला असला तरी राज्यातील काही नेत्यांच्या विरोधामुळे आपला प्रवेश थांबल्याचे सांगितले होते.
दरम्यान, या सर्व बाबींच्या पार्श्वभूमिवर, आमदार एकनाथराव खडसे यांनी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या दोन नेत्यांमधील चर्चेचा तपशील समोर आला नसला तरी यात खडसे यांच्या भाजप प्रवेशाबाबत वार्तालाप झाल्याचे समजते. स्वत: खडसे वा फडणवीस यांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. तथापि, यामुळे खडसे यांच्या भाजपमधील घरवापसीच्या चर्चांना यामुळे उधाण आले आहे.