जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील अजिंठा चौफुली येथे इनोव्हा चारचाकी वाहन वळण घेत असतांना आयशर ट्रकने दिलेल्या धडकेत चारचाकी वाहनाचे नुकसान झाल्याची घटना शनिवारी ७ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता घडली आहे. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील संत सावता नगरमधील रहिवासी सचिन बाळू पाटील (वय २९) हे शनिवारी ७ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास त्यांचे चारचाकी इनोव्हा वाहन (क्र. एमएच १९, ईए ६८००) घेऊन अजिंठा चौफुलीवरून जामनेरकडे वळण घेत होते. त्यावेळी आयशर ट्रक (क्र. एमएच १८, डीजी ९७१२)ने दोन्ही वाहनांमध्ये अंतर न ठेवता ट्रक थेट चारचाकी वाहनाजवळ आणून धडक दिली. यात चारचारकी वाहनाचा मागील भाग चेपला गेला असून काही भाग घासला गेला. याप्रकरणी चारचाकी वाहन चालक सचिन पाटील यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात ट्रक चालक सुनिल दत्तात्रय पाटील रा. किनोद ता.जळगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक गणेश वंजारी हे करीत आहे.