शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव आयोजित अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व मुल्यमापन प्रशिक्षण शिबीर

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव आयोजित अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन यावल तालूकास्तरीय प्रशिक्षणाचे तीन टप्पे पूर्ण झाले असून चौथ्या टप्प्याला कन्या शाळा यावल येथे सुरुवात झाली आहे. यामध्ये जिल्हा परिषद शाळा, अनुदानित खाजगी शाळा प्राथमिक, माध्यमिक व आश्रम शाळेत इयत्ता ५ते ८ ला शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या शिक्षक प्रशिक्षणाच्या चौथ्या टप्प्यात तालुक्यातील एकूण ८५० शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या सुत्रांकडून मिळाली आहे.

या प्रशिक्षणात जागतिक विश्वासार्हता असणारा विद्यार्थी कसा तयार करायचा, त्याचे ६ सी, ९ बुद्धिमत्ता व ४ आयाम, कशा विकसित करायच्या व शिकायचे कसे हे शिकवून विद्यार्थ्यांचा अध्ययनाचा वेग तिप्पट कसा करायचा हे प्रशिक्षणात शिकविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण गतिमान करणे काळाची गरज झालेली आहे.

मुलांना एकतर्फी शिकवण्यापेक्षा ती स्वतःहून शिकतील, त्यांच्यामध्ये जिज्ञासूवृत्ती विकसित होईल. आव्हाने पेलण्यास किंवा स्वीकारण्यास विद्यार्थी सक्षम बनतील,स्वतःहून शिकण्यास प्रेरित होतील, या दृष्टीने शिक्षकांनी नियोजन व व्यवस्थापन कसे करावे, यानुसार अध्ययन प्रक्रियांचे व्यवस्थापन या प्रशिक्षणाची रचना केलेली आहे.राज्यातील अनेक प्रयोगशील शिक्षक, शाळा, संस्था भविष्यातील आव्हानांना डोळ्यासमोर ठेवून कार्य करवे हा या प्रशिक्षणाचा मुख्य हेतू आहे. प्रशिक्षण वर्गास केंद्रप्रमुख किशोर पाटील, वसंत सोनवणे, गिरीश सपकाळे, योगेश इंगळे, कुंदन वायकोळे, राहुल पाटील विजय बाविस्कर, संदीप मांडवकर , रवींद्र पाटील सर्व तज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षण वर्गास प्रबोधन करीत आहेत.

‘युनेस्कोने’ शिक्षणाची व्याख्या ‘शिकायचे कसे? हे शिकणे म्हणजेच शिक्षण अशा प्रकारे अधोरेखित केली आहे. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार सन २०२६-२७ पर्यंत विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत भाषा साक्षरता आणि अंकीय साक्षरता प्राप्त होणे अपेक्षित आहे. मुलांमध्ये एकविसाव्या शतकातील गंभीर विचार, सर्जनशील विचार, सहयोग, संवाद, आत्मविश्वास, करुणा या सहा कौशल्यांना विकसित करण्याच्या दृष्टीने शिक्षकांनी केवळ वर्गात शिकवणे एवढीच कृती पुरेशी ठरणार नाही. अध्ययन निष्पत्ती आधारित आव्हानांची निर्मिती करून ती विद्यार्थ्यांना अंगीकृत करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करायला पाहिजे असे मार्गदर्शन यावल पंचायत समितीचे तालुका गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांनी शिक्षक अध्ययन प्रसंगी उपाधित वर्गाला केले.

Protected Content