धनाजी नाना महाविद्यालयाला विद्यापीठाच्या मानांकन यादीत ‘अ’ दर्जा

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाला विद्यापीठाच्या मानांकन यादीत ‘अ’ दर्जा मिळाला आहे.

तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर हे ग्रामीण भागातील सर्व सोयी सुविधांनी युक्त असलेले सुसज्ज व भव्य असे महाविद्यालय आहे. महाविद्यालयाचा दर्जा कायम राखण्यासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्रशासन व व्यवस्थापन मंडळ नियमित प्रयत्न करत असते, याचाच परिणाम म्हणून विद्यापीठ स्तरावर नुकत्याच जाहीर झालेल्या मानांकन यादीत धनाजी नाना महाविद्यालयाला ‘अ’ दर्जा प्राप्त झाला आहे. महाविद्यालयाच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव तर्फे दर तीन वर्षांनी महाविद्यालयांचे शैक्षणिक ऑडिट करण्यात येते यावर्षी ही मागील तींन वर्षाची माहिती व अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात आले होते. महाविद्यालयांनी दिलेल्या ऑनलाईन माहितीच्या आधारे सर्व दस्तावेजांची सत्यता पळतळणी करून शैक्षणिक ऑडिट करण्यात आले होते. ऑडिटमध्ये तिन्ही जिल्ह्यातील ज्या महाविद्यालयांनी शैक्षणिक क्षेत्रात, विविध उपक्रम राबवून, उत्तम कामगिरी केली असेल त्या महाविद्यालयांना अंकेक्षण प्रक्रियेद्वारे अ, ब, क, अशी श्रेणी देण्यात आली. यात फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयला अंकेक्षण प्रक्रियेत जास्त गुण मिळाल्यामुळे ‘अ’ श्रेणी देण्यात आली आहे.

महाविद्यालयाला ‘अ’ श्रेणी मिळावी या दृष्टीने प्राचार्य डॉ. पी.आर.चौधरी यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे प्राध्यापकांनी केलेले विविध संशोधनात्मक कार्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, राज्य व विभागीय स्तरावरील कार्यशाळा,अधिवेशन, सेमिनार यांचे आयोजन, व याच अनुषंगाने प्राध्यापकांनी केलेला सहभाग, शोध आलेख वाचन, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शोध मासिकांत प्रकाशित केलेले दर्जेदार शोध निबंध, शोध आलेख, शोध ग्रंथ तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व व्यक्तीमत्व विकासाच्या दृष्टीने घेण्यात आलेले विविध कार्यक्रम, वार्षिक परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश, प्राप्त गुणांची टक्केवारी, विद्यापीठ स्तरावर मिळविलेले पदके, खेळ व स्पर्धांमध्ये केलेली उत्कृष्ट कामगिरी, इतर शैक्षणीक व सामाजिक उपक्रम, अशा सर्व बाबी लक्षात घेवून गुणांकन केले जाते.

त्यात प्रत्येक उपक्रमांचे गुण ठरलेले असतात परंतु धनाजी नाना महाविद्यालयाने सर्व स्तरावर उत्तम कामगिरी केल्यामुळे सर्व उपक्रमांत महाविद्यालयाला जास्तीतजास्त गुण मिळाले, साहजिकच महाविद्यालयाच्या गुणांमध्ये वाढ झाली म्हणून विद्यापीठाच्या मानांकनात महाविद्यालयाला ‘अ’ श्रेणी प्राप्त झाली.

महाविद्यालयाच्या या यशाबद्दल तापी परिसर विद्या मंडळ, संस्थेचे अध्यक्ष आमदार शिरीषदादा चौधरी यांनी व संस्थेच्या सर्व पदाधिकार्‍यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.आर.चौधरी त्यांचे सर्व सहकारी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content