बनावट अपंग कार्ड प्रकरणी माजी एस. टी. चेकिंग अधिकारी व जावयावर दोषारोप पत्र दाखल

जळगाव प्रतिनिधी । बनावट अपंग कार्ड बनवून प्रवास करणार्‍या शिक्षकासह त्याच्या सेवानिवृत्त झालेल्या चेकींग अधिकार्‍यावर दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे. यामुळे आता या प्रकरणी न्यायालयीन प्रक्रिया सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

याबाबत वृत्त असे की, दिनांक २ जुलै २०१९ रोजी सायंकाळी सहा वाजता मुकटी ते धुळे बस प्रवास करतांना जळगांव आगाराचे वाहक गोपाळ पाटील यांना प्रशांत कांगणे (शिक्षक, रा. मुकटी) या व्यक्तीकडे बनावट अपंग कार्ड आढळले होते. हा प्रवाशी स्वतः कार्ड विकत असल्याचा संशय त्यांना आला. यामुळे त्याचे रीतसर कार्ड जमा करण्यात आले. सदर कार्ड मिळविण्यासाठी प्रशांत कांगणे यांचे सासरे एम. ओ. नाईक (सेवानिवृत्त एसटी चेकर) यांनी दबाव आणला होता. सदर प्रवाशी धुळे बसस्थानकावर पसार झाला. तद्नंतर जळगांव आगाराचे एसटी वाहक गोपाळ पाटील यांनी धुळे विभागाचे विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ व भगवान जगनोर (तत्कालीन आगार व्यवस्थापक) यांच्या मदतीने दिनांक ०९/०७/ २०१९ रोजी गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून वरील संबंधित दोन्ही आरोपींच्या विरोधात भरपूर पुरावे गोळा केलेत त्या पुराव्यानुसार न्यायालयात दोषारोप पत्र भरून पाठविण्यात आले. न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाल्याचे धुळे पोलिसांनी कळविले आहे.

या प्रकरणी गुन्हा दाखल करून पाठपुरावा करणारे वाहक तथा कामगार सेनेचे प्रसिध्दी सचिव गोपाळ बी. पाटील यांनी म्हटले आहे की, तत्कालीन विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांनी एसटीच्या वाहकास अशा प्रकरणात कायद्यानुसार केस करता येत नसल्याचा दावा करून अप्रत्यक्षपणे आरोपींची बाजू घेतली होती. कायद्याने एसटी चालक वाहकास केस करण्याचे अधिकार असल्याचे सिद्ध झाले. धुळे विभागाच्या एसटी अधिकारी व पोलिसांनी पुरेपूर सहकार्य दिल्याने संबंधितांविरुद्ध दोषारोप पत्र न्यायालयात दाखल झाले आहे. शेवटी सत्याचाच विजय होईल, हा ठाम विश्‍वास असल्याचे गोपाळ पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Protected Content