जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शिरसोली रस्त्यावर अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारा डंपर उलटल्याने खळबळ उडाली आहे. एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन डंपर आणि वाळू जप्त केली आहे. याप्रकरणी डंपर चालक रविंद्र आनंदा कोळी (वय २३, रा. कोळीवाडा, माचले, ता. चोपडा, हल्ली मुक्काम बांभोरी, ता. धरणगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (एमएच १६, क्यू १४१९) क्रमांकाचा डंपर शिरसोली रस्त्यावरून अवैधरित्या वाळूची वाहतूक करत होता. १८ एप्रिल रोजी रात्री सुमारे ११ वाजेच्या सुमारास श्रीकृष्ण लॉन्सजवळ हा डंपर अचानक उलटला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळ गाठले.
पोलिसांनी डंपरमधील वाळूसह एकूण ३ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस कर्मचारी नरेंद्र मोरे यांनी या घटनेची फिर्याद दाखल केली असून, उपनिरीक्षक मोहन पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.