यावल तालुक्यात गुटख्याची खुलेआम तस्करी आणि विक्री !

यावल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यात प्रतिबंधित गुटख्याची खुलेआम विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कथित दुर्लक्षामुळे आणि केवळ दिखाऊ कारवाईमुळे गुटखा माफियांचे मनोबल वाढले असून, लाखो रुपयांचा विमल गुटखा सार्वजनिक ठिकाणी राजरोसपणे विकला जात आहे. प्रशासनाच्या भूमिकेबाबत नागरिकांमध्ये तीव्र संशय व्यक्त होत आहे.

मानवी जीवनासाठी अत्यंत हानिकारक असणाऱ्या तंबाखूजन्य व निकोटीन मिश्रित गुटख्याच्या विक्रीवर देशभरात बंदी असताना, यावल तालुक्यात मात्र खुलेआम उल्लंघन होत आहे. शेजारच्या गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांतून चोरट्या मार्गाने, खाजगी वाहने तसेच एस.टी. बसच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी केली जात आहे.

तालुक्यातील बसस्थानक परिसर, शाळांच्या आजूबाजूचा भाग, शहरातील मुख्य बाजारपेठ आणि गल्लीबोळातील किराणा दुकानांमध्ये विमल गुटख्याची सर्रास विक्री होत आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग या गंभीर प्रकाराकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. स्थानिक पोलीस प्रशासनाकडून काही ठिकाणी किरकोळ स्वरूपाची कारवाई केली जात असली तरी, गुटख्याची आवक आणि विक्री थांबवण्यात त्यांना यश आलेले नाही.

यावल तालुका आणि परिसरात दरमहा अंदाजे ५० ते ६० लाख रुपयांचा गुटखा परराज्यातून आयात करून विकला जातो. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या निष्क्रियतेमुळे त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. आर्थिक फायद्यासाठी ठोस कारवाई टाळली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे, अन्न व औषध प्रशासनाने या गुटखा विक्रीच्या मोठ्या जाळ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Protected Content