फाशीची तारीख ठरल्याने निर्भयाच्या गुन्हेगारांना भीतीने ग्रासले

nirbhayas criminals

नवी दिल्ली, वृत्तसंस्था | फाशीची तारीख आणि वेळ ठरल्यानंतर निर्भया प्रकरणातील गुन्हेगार भीतीने ग्रासले आहेत. चौघा दोषींच्या वागण्यात बराच बदल झाला आहे. त्यांचे वागणे विचित्र झाले आहे. चौघांपैकी तिघे हिंसक, तर एक जण अगदी शांत बसला आहे. त्यात दोषी मुकेश सिंह याला आईच्या भेटण्यासाठी परवानगी दिली गेली. आईला भेटल्यानंतर तो भावूक झाला आणि रडला, अशी माहिती मिळाली आहे.

 

निर्भया बलात्कार आणि हत्त्याप्रकरणी कोर्टाने दोषींच्या फाशीची शिक्षा कायम ठेवली असून, डेथ वॉरंट जारी केले आहे. त्यांच्या फाशीची तारीख आणि वेळ ठरवण्यात आली आहे. फाशीची शिक्षा सुनावल्यापासून आणि तारीख, वेळ निश्चित झाल्यापासून या चौघा गुन्हेगारांच्या वागण्यात बदल झाला आहे. भीतीने त्यांना ग्रासले असून, ते विचित्र वागत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या चौघांपैकी एक असलेल्या मुकेशला आईच्या भेटीची परवानगी दिली. आईला भेटल्यानंतर तो भावूक झाला आणि रडला. त्याच्या आईने त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. क्युरेटिव्ह आणि दया याचिकेचा पर्याय असल्याचे सांगून तिने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो शांत झाला. आईला भेटल्यानंतर मुकेशने वडील आणि भावाबद्दल विचारपूस केली.

तुरुंग अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही अखेरची भेट नसेल. नियमांनुसार, त्यांना आठवड्यातून दोन वेळा कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. फाशी देण्याआधी अखेरच्या भेटीबाबत कुटुंबीयांना माहिती दिली जाईल. फासावर लटकावल्यानंतर कुटुंबीय दोषींच्या सर्व वस्तू घरी घेऊन जाऊ शकतील. तुरुंगातील सूत्रांच्या माहितीनुसार, निर्भयाचे गुन्हेगार तुरुंगात कुणाशीही बोलत नाहीत. चौघांच्या वागणुकीत बदल झाला आहे. मुकेश, अक्षय, पवन तर बुधवारी तुरुंगातील कर्मचाऱ्यांशी वाद घालत होते. जेवणावरून हा वाद झाल्याचे कळते तर चौथा दोषी विनय शर्मा हा शांत बसला होता. दरम्यान, दोषींच्या फाशीची तयारी तुरुंग प्रशासनाने केली आहे. त्यांना धार्मिक पुस्तके दिली जातील. त्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे.

Protected Content