धाबे जि.प. शाळेत राष्ट्रमाता जिजाऊ, विवेकानंद यांना अभिवादन

dhabe z.p school

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील धाबे येथील जिल्हा परिषद प्राथ. शाळेत राष्ट्रमाता जिजामाता व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. तसेच राज्य आदर्श शिक्षक, मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे व महात्मा ज्योतीराव फुले गुरू गौरव पुरस्कार विजेते गुणवंतराव पाटील यांच्या संकल्पनेतून आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी शिक्षक विदयार्थी व ग्रामस्थ यांनी त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार, फुले अर्पण, पूजन, करून अभिवादन केले. धाबे शाळेत व गावात सण, उत्सव, जयंती व पुण्यतिथी साजरा करतांना युवकांच्या मदतीने अगोदर शाळा व गाव परिसराची साफ सफाई केली जाते. ती या प्रसंगीही करण्यात आली. अशा प्रसंगी शाळेच्या विदयार्थींनी यासाठी लागणारा फुलहार स्वतःच्या हाताने उपलब्ध फुले गोळा करून बनवितात. हे करण्यामागचा उद्देश व हेतु सफल करण्याचा प्रयत्न शाळा शिक्षकांकडुन केला जात असतो.

आज प्रत्येकाला वाटते, या देशात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे, त्या अगोदर मात्र राष्ट्रमाता राजमाता जिजामाता जन्माला आल्या पाहिजेत. त्यासाठी बालपणापासुनच त्यांच्यावर ते संस्कार व चरित्र त्यांच्या समोर मांडले पाहिजे. आज आपल्या समाजात माताभगिनी व काही बांधव याबाबत निश्चितच आपले योगदान देत आहेत. राष्ट्रमाता जिजामातांचे स्मरण व आदर्श जीवनभर राहावेत म्हणुन आज शाळेच्या इ.१ ली ते इ.४ थी पर्यंतच्या प्रत्येकी एक नियमित शाळेत येणाऱ्या व सर्व गोष्टीत सहभाग घेणाऱ्या चार विदयार्थीनींना सुंदर असे पोशाख मुख्याध्यापक साळुंखे यांच्या पत्नी चित्रा पाटील यांनी सप्रेम भेट यावेळी दिली.

शाळेत (दि.३) जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीपासुन ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ अभियान राबविण्यात येत आहे. याप्रसंगी स्त्री अस्मितेचे प्रतिक व राष्ट्रभक्तीचे ज्वलंत उदाहरण राष्ट्रमाता जिजाऊ व प्रखर देशाभिमान व राष्ट्रीय संस्कृतीचे प्रतिक स्वामी विवेकानंद यांचे कार्य व जीवन परिचय विदयार्थी व ग्रामस्थ यांना शाळेच्या शिक्षकांनी करून दिला.

यावेळी कार्यक्रमाप्रसंगी जि.प. शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर व कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. कार्यक्रमासाठी मयुर शिंपी यांचे सहकार्य लाभले आहे.

Protected Content