डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध! मृतांना श्रद्धांजली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी। डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येत या घृणास्पद घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

या शोकसभेत वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. प्रशांत सोळंके यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. त्यांनी दहशतवाद्यांच्या या क्रूर कृत्याची निंदा केली आणि मृतांच्या कुटुंबीयांप्रति आपल्या संवेदना व्यक्त केल्या. डॉ. चंद्रय्या कांते आणि प्रा. डॉ. बापूराव बिटे यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत, अशा प्रकारची हिंसा कधीही स्वीकारली जाणार नाही, असे मत व्यक्त केले.

महाविद्यालयाचे जनरल सेक्रेटरी शिवराज दाभाडे, ललित सोनार, श्रावणी अवरगांडे, आदित्य निरवळ, स्वराज उभाड आणि चारूदत्त साळुंखे यांच्यासह अनेक विद्यार्थी या श्रद्धांजली सभेत सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी हातात मेणबत्त्या घेऊन मृतांना शांतता लाभावी, यासाठी प्रार्थना केली.

याप्रसंगी उपस्थितांनी दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी एकजूट दाखवण्याचे आवाहन केले. डॉ. प्रशांत गुडेट्टी यांनी सांगितले की, अशा घटनांमुळे देशातील शांतता आणि सलोखा बिघडवण्याचे प्रयत्न केले जातात, परंतु आपण सर्वांनी एकत्र राहून या शक्तींना पराभूत केले पाहिजे. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करून, त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याची भावना व्यक्त केली.

Protected Content