डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातर्फे ‘शेणखत व गांडूळखत’ बनविण्याबाबत प्रशिक्षण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत रावेर तालुक्यातील खिर्डी येथे शेणखत आणि गांडूळ खत बनविण्याची शास्त्रीय पध्दत व फायदे या बद्दल प्रशिक्षण देण्यात आले.

कृषी महाविद्यालयातील अंतिम वर्षाचे कृषीदुत नानासाहेब गोरड, निखिल कुलट,ऋषिकेश मंगळे, अनिकेत मंडले,जयेश कानडजे आणि रुपेश अकुलेटी यांनी हे प्रशिक्षण दिले. हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे कार्यक्रम समन्वयक प्रा.बी.एम.गोणशेटवाड आणि कार्यक्रम अधिकारी प्रा.वि.य. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आला.

शेणखत हे पारंपारिक सेंद्रिय खत असून शेतकऱ्यांना ते सहज उपलब्ध होऊ शकते. सर्वसाधारणपणे चांगल्या कुजलेल्या शेणखतात ०.४ टक्के नत्र, ०.१५ टक्के स्फूरद आणि ०.५० टक्के पालाश असते, आपल्या देशातील उष्ण व दमट हवामानाच्या परिस्थितीत जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे विघटन वेगाने होऊन सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण कमी होते जाते. त्यामुळे जमिनीची सुपिकता टिकवून पिकांचे भरघोस उत्पादन मिळविण्यासाठी शेणखतासारख्या सेंद्रिय वरखताचा वापर करणे आवश्यक आहे.

गांडूळखत हे भरपूर अन्नद्रव्ये, संप्रेरके असणारे दाणेदार सेंद्रीय खत असून जैविक गुणधर्म वाढविते. गांडूळखत हा सेंद्रीय शेतातील एक महत्वाचा घटक आहे.

गांडूळ खतामुळे जमीन भुसभुशीत राहते, त्यामुळे जमिनीत हवा व पाणी खेळते राहते व पिकांची वाढ अधिक वेगाने होते. गांडूळ खतामुळे पाण्याचा योग्य निचरा होतो व जमिनीची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढते. पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढल्याने, पाऊस नियमित न झाल्यास, पिकाला पाण्याचा ताण पडत नाही. बागायती पिकांबाबत सिंचनाचा खर्च कमी होतो व पाण्याची बचत होते. गांडूळ खत हे कचऱ्यापासून निर्माण होते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी गांडूळ खत निर्माण करायला हवे. अशाने उत्पादन खर्च कमी होतो आणि चांगला नफा मिळतो.

Protected Content