जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, जळगाव येथे महर्षी कालिदास जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने पुढील आठ दिवस संस्कृत भाषा सप्ताह साजरा केला जाणार असून, या काळात विविध सांस्कृतिक, शैक्षणिक आणि भाषिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजचे संचालक डॉ. आर्विकर सर यांनी संस्कृत भाषेचे महत्त्व, तिचा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आधुनिक काळातील उपयोग यावर सखोल मार्गदर्शन केले. संस्कृत ही केवळ प्राचीन भाषा नसून ज्ञान, चिकित्सा आणि अध्यात्म यांची एक समृद्ध परंपरा आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.
यावेळी कॉलेजचे अधिष्ठाता (डीन) डॉ. हर्षल बोरोले सर यांनी विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेचा अभ्यास करण्याचे आवाहन केले. वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात या भाषेचा उपयोग कसा करता येईल, यावर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच, या आठवड्याच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या जयंती कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी संस्कृत श्लोक पठण, नाट्य सादरीकरण आणि कालिदासांच्या साहित्यावर आधारित विविध कलाकृती सादर केल्या. या संस्कृत सप्ताहाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, भाषा आणि परंपरेबद्दल नवीन जाणिवा निर्माण होण्यास मदत होणार आहे.