डॉ. उल्हास पाटील कोवीड रूग्णालयातील सुविधांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रोज हजाराच्या पटीत रूग्ण आढळुन येत असल्याने रूग्णालयांमध्ये दाखल रूग्णांची मोठी गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कोविड काळात रूग्णसेवेत महत्वाची भूमिका बजावणार्‍या डॉ. उल्हास पाटील कोविड रूग्णालयास भेट दिली. या भेटीत त्यांनी रूग्णांना देण्यात येणार्‍या सुविधांचा आढावा त्यांनी घेतला. 

जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव अत्यंत वेगाने होत असुन जळगाव, चोपडा, चाळीसगाव या तालुक्यांमध्ये रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोविड काळात लागू केलेल्या रूग्ण सेवा पुन्हा नव्याने कार्यरत करण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासनाकडुन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत हे सातत्याने जिल्ह्यातील सर्व रूग्णालयांचा आढावा घेत आहेत. कोविड काळात डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील ४०० बेड अधिग्रहीत करण्यात आले होते. सद्यस्थितीला डॉ. उल्हास पाटील कोविड रूग्णालयात ३५० हून अधिक कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहे.  कोविड काळात रूग्णांसाठी वरदान ठरलेले डॉ. उल्हास पाटील कोविड रूग्णालयालाही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी भेट दिली.

या भेटीत जिल्हाधिकारी राऊत यांनी रूग्णालयाचे चेअरमन माजी खा. डॉ. उल्हास पाटील, गोदावरी फाऊंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, कोविड रूग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे रजीस्ट्रार प्रमोद भिरूड यांच्याशी त्यांनी चर्चा केली. डॉ. उल्हास पाटील कोविड रूग्णालयात सद्यस्थितीला रूग्णांवर सुरू असलेल्या उपचारांचीही त्यांनी माहिती घेतली. रूग्णालयात रूग्णांना दिल्या जाणार्‍या सोयी-सुविधांविषयी जिल्हाधिकारी राऊत यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. नागोराव चव्हाण हे देखिल उपस्थित होते. डॉ. उल्हास पाटील कोविड रूग्णालयात अति लक्षणे आणि सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांचे स्वतंत्ररित्या विलगीकरण करण्यात आले आहे. तसेच डॉ. उल्हास पाटील कोविड रूग्णालयात दाखल झालेल्या प्रत्येक रूग्णांसाठी दोन वेळेचा चहा, नाश्ता, जेवण याची उत्तम सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सर्व सुविधांचा जिल्हाधिकारी राऊत यांनी आढावा घेतला.  

Protected Content