बाबासाहेब भारतीय एकात्मिक समाजाचे स्वप्न पाहणारे महामानव : डॉ. संजीवकुमार सोनवणे

sanjivkumar sonawane

जळगाव (प्रतिनिधी) आधुनिक भारताच्या इतिहासात महात्मा जोतिबा फुले आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे एक युगप्रवर्तक तत्वज्ञ आणि परिवर्तनवादी विचारवंत होते. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला जगात तोड नाही, छत्रपती शाहू महाराज यांनी चालवलेला महात्मा फुले यांचा वारसा बाबासाहेब आंबेडकर यांनी चालवला. देशाला देशाला स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित समाज निर्मिती साठी त्यांनी वाहून घेतले, जातीअंताची कल्पना मांडून ते एकात्मिक समाजाचे स्वप्न पहात होते, असे प्रतिपादन धरणगाव येथील कवी डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी केले. मणियार विधी महाविद्यालयात आज महात्मा फुले आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी हे होते तर मंचावर अॅड. संजय महाजन, प्रा. जी. व्ही. धुमाळे हे उपस्थित होते.

आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी महात्मा फुले,शाहू महाराज आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील वैचारिक गुरू शिष्य परंपरेचा आढावा घेतला. डॉ. आंबेडकर यांचा ‘आधी मी या देशाचा आणि अंतिमतःही या देशाचा’ ही संकल्पना स्पष्ट करून बाबासाहेबांच्या चळवळीचा केंद्रबिंदू ‘माणूस ‘हाच होता आणि त्याचेच प्रतिबिंब हे भारतीय राज्यघटनेत उमटले असल्याची मांडणी केली. या प्रसंगी अॅड. संजय महाजन आणि प्राचार्य डॉ. रेड्डी यांचीही समयोचित भाषणे झाली.प्रास्ताविक प्रा. जी. व्ही. धुमाळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित रंधे यांनी केले तर आभार आशुतोष चंदेल यांनी मानले.
यावेळी घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना महापुरुषांची पुस्तके भेट देण्यात आली. विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य तैलचित्र महाविद्यालयला भेट दिले. कार्यक्रमासाठी दिपक सोनवणे, निलेश जाधव, यशोदिप यांनी परिश्रम घेतले. यावेळी प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Add Comment

Protected Content