ओ शेट….पोलिसांना डान्सच भोवलाय थेट !

जळगाव प्रतिनिधी | सहाय्यक फौजदाराच्या निरोप समारंभातील पार्टीत प्रहार जनशक्तीचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख अनिल चौधरी यांच्यासोबत बेधुंद डान्स केल्याप्रकरणी पाच पोलीस कर्मचार्‍यांची चौकशी होणार असून त्यांना नियंत्रण कक्षात जमा होण्याचे आदेशही मिळणार असल्याचे स्पष्ट झाल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत वृत्त असे की, सहाय्यक फौजदार वासुदेव सोनवणे हे जुलै अखेर सेवानिवृत्त झाले. त्यांना सहकार्‍यांतर्फे रविवारी दुपारी एका हॉटेलमध्ये जंगी निरोप देण्यात आला. या कार्यक्रमात भुसावळचे माजी नगराध्यक्ष तथा प्रहार जनशक्तीचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख अनिल चौधरी यांना उपस्थित पोलीस कर्मचार्‍यांनी खूप आग्रह करून नाचायला लावले. यात पहिल्यांदा मै हू डॉन गाणे लावण्यात आले, तर ते गाणे थांबवून ओ शेट…तुम्ही नादच केलाय थेट…हे गाणे लागल्यानंतर चौधरींनी पोलीस कमर्र्चार्‍यांसह जोरदार ठुमके लावले. उपस्थितांपैकी एकाने याचे चित्रीकरण करून ते सोशल मीडियात टाकले. यामुळे प्रचंड खळबळ उडाली.

पोलीस कर्मचारी हे देखील सर्वसामान्य लोक असले तरी सार्वजनीक जीवनात वावरतांना त्यांनी काही संकेतांचे पालन करण्याची आवश्यकता आहे. अनिल चौधरी यांच्यासोबत पोलिसांची असणारी सलगी ही अनेकांना आश्‍चर्यकारक ठरली. यामुळे सोशल मीडियात प्रचंड चर्वण झाले. याची पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांची गांभिर्याने दखल घेतली.

डॉ. मुंढे यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. यामुळे या पार्टीला उपस्थित असणारे सहायक फौजदार केदार, प्रफुल्ल धांडे, योगेश पाटील, गणेश पाटील आणि विजय निकुंभ यांची या प्रकरणात चौकशी करण्यात येणार आहेत. तर पोलीस अधिक्षकांनी या सर्वांना नियंत्रण कक्षात जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. तूर्तास त्यांना तोंडी सांगण्यात आले असले तरी आज याबाबत लेखी निर्देश मिळण्याची शक्यता आहे.

Protected Content