बुवाबाजीला शरण गेलात तर शोषणाला बळी पडण्याची शक्यता

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जगात चमत्कार घडत नाही. घडणाऱ्या चमत्कारामागे विज्ञान, रासायनिक अभिक्रिया असते. किंवा हातचलाखी असते. चमत्काराला नमस्कार करून बुवाबाजीला शरण गेलात तर तुमचे शोषण नक्कीच होणार. त्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत ठेवा, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र चौधरी यांनी केले.

 

जामनेर शहरात चमत्कार प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. मंचावर  जिल्हा उपाध्यक्ष नाना लामखेडे, जिल्हा प्रधान सचिव प्रल्हाद बोऱ्हाडे, जामनेर शाखा प्रधान सचिव बी. आर. पाटील उपस्थित होते. प्रास्ताविकात प्रल्हाद बोऱ्हाडे यांनी शिबीर घेण्यामागील उद्देश स्पष्ट केला. नाना लामखेडे यांनी मनोगत व्यक्त केले. चमत्कार दाखवून अनेक बुवा लोकांचे शोषण करतात. लोकांनी जागृत राहून बुवांकडे जाणे बंद केले पाहिजे, असे ते म्हणाले.

 

यानंतर  जिल्हा कार्याध्यक्ष रविंद्र चौधरी यांनी चमत्कार सादरीकरण व त्यामागील विज्ञान समजावून सांगितले. यात पाण्याने दिवा पेटविणे, मनातील ईच्छा पूर्ण होतांना घुंगरू वाजणे, नारळातून करणी काढणे, गडव्यात भूत उतरविणे, मंत्रशक्तीने अग्नी प्रज्वलित करणे, दूध पिऊन दुसऱ्याच्या कानातून काढणे इत्यादी तत्सम प्रयोग करून दाखविले. त्यांनतर सादरीकरण करून त्यातील विज्ञान, हातचलाखी स्पष्ट केली. प्रल्हाद बो-हाडे यांनी त्यांना सहाय्य केले.

 

सूत्रसंचालन राजेश्वरी राजपूत यांनी केले. आभार बी. आर. पाटील यांनी मानले. प्रसंगी जिल्हा पदाधिकारी सुशीला चौधरी यांचेसह शाखेतील ॲड. राजू मोगरे, डॉ. मोहिनी मोरे, रितेश मोरे, रमेश पाटील, संदिपकुमार बाविस्कर, युवराज अहिरे, रमेश गायकवाड, जानकोजी पाटील, रामदास सोनवणे, तीर्थराज सुरवाडे, सुनंदा सोनवणे, संतोष  जाधव, हरी पाटील आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content