जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील पेट्रोल व डिझेलच्या सुरळीत पुरवठ्यासाठी सर्वतोपरी दक्षता घेण्यात येत असून नागरिकांनी अनावश्यक साठा न करता पेट्रोल पंपावर गर्दी करू नये, असे आवाहन जळगाव जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पेट्रोल व डिझेलच्या सुरळीत पुरवठ्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा यंत्रणा व्यस्त आहे. पेट्रोल- डिझेल डीलर्स असोसिएशनच्या स्थानिक पदाधिकार्यांसोबत आज जिल्हाधिकार्यांची सकारात्मक चर्चा झाली. यावेळी सर्व प्रमुख कंपन्यांचे वितरक व प्रतिनिधीही उपस्थित होते.
जळगाव जिल्ह्याला मनमाड (पानेवाडी) डेपोतून इंधन पुरवठा होतो. आज सकाळपासून नाशिक विभागीय आयुक्त यांच्या सूचनेनुसार नाशिक जिल्हाधिकार्यांचे स्वतंत्र पथक तेथे कार्यरत असून या पथकाशी संपर्कात राहून जिल्ह्यातील इंधनाचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी काम करण्यात येत आहे. त्यांना नाशिक ग्रामीण पोलीस बल आवश्यक ते मनुष्यबळ पुरवून थांबलेला इंधन पुरवठा सुरळीत करण्यात येत आहे.
जिल्ह्यात विविध टप्प्यात पुरेशा इंधन पुरवठा सुरळीत करण्याचे जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. संपात नसलेली इंधन वाहने जिल्ह्यातील इंधन पंपाकडे मार्गस्थ होत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता पेट्रोल पंपावर गर्दी न करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.