मोठी बातमी : वाहतुकदारांचा संप मिटला; तूर्तास लागू होणार नाही नवीन कायदा

नवी दिल्ली-वृत्तसेवा | ट्रक वाहतुकदारांची राष्ट्रीय संघटना आणि केंद्र सरकारमधील बोलणी यशस्वी झाल्यामुळे राष्ट्रव्यापी संप मागे घेण्यात आल्याची घोषणा रात्री उशीरा करण्यात आली आहे. तर तूर्तास नवीन वाहन कायदा लागू होणार नसल्याचे सूतोवाच या बैठकीत करण्यात आल्याचे वृत्त आहे.

केंद्र सरकारने अलीकडेच तीन फौजदारी कायदे नव्याने तयार केले आहेत. यात मोटार वाहन कायद्यातील हिट अँड रन या प्रकारातील गुन्ह्यासाठी कठोर तरतूद करण्यात आली आहे. यासाठी सात वर्षांचा कारावास आणि दहा लाख रूपयांपर्यंतचा दंड ठोठावण्यात येणार आहे. आधीपेक्षा हा कायदा खूप कठोर करण्यात आला आहे. यामुळे याला देशभरात विरोध होऊ लागला आहे.

दरम्यान, नवीन कायद्यांना विरोध करण्यासाठी १ जानेवारी पासून देशभरातील वाहन चालक आणि मालकांनी आंदोलन सुरू केले होतेे. हा कायदा मागे घ्यावा अशी मागणी करण्यात येत आहे. दोन दिवसात या आंदोलनाची तीव्रता दिसून आली. ठिकठिकाणी केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. तर बर्‍याच ठिकाणी चक्का जाम आंदोलने झाली. याचा मोठा फटका हा इंधन वाहतुकीला बसण्याची शक्यता असल्याने अनेक शहरामधील पेट्रोल व डिझेल पंपांवरील इंधन संपले. जर संप सुटला नाही तर देशात अभूतपुर्व इंधन टंचाई होण्याची शक्यता होती.

या अनुषंगाने, केंद्रीय गृह मंत्रालय आणि वाहतुकदारांच्या संघटना यांच्या प्रदीर्घ बैठक झाली. रात्री उशीरा ही बैठक संपली. यात नवीन मोटर वाहन कायद्यातील शिक्षा आणि दंडाच्या नव्या तरतुदी लागू होणार नसल्याची भूमिका केंद्र सरकारने मांडली. यामुळे देशव्यापी संप मागे घेण्याचा निर्णय जाहीर झाला. मालवाहतूकदार, टँकर चालकांचा संप मागे घेतला जाणार असून आजपासून मालवाहतूक सुरळीतपणे सुरू होईल, असा अंदाज आहे. ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट कॉंग्रेसने चालकांना वाहतूक तात्काळ सुरू करण्याचे आवाहन केले आहे. अर्थात, यामुळे आज देशभरातील पेट्रोल पंपांवरून इंधन मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content