बेलगंगा साखर कारखान्याच्या व्यवहाराचीही ईडी चौकशी करा : करपे

चाळीसगाव प्रतिनिधी | भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी चाळीसगाव तालुक्यातील बेलगंगा सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीची ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी तालुक्यातील उंबरखेड येथील उमेश करपे यांनी केली आहे.

याबाबत वृत्त असे की, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी संशयास्पद व्यवहार असणार्‍या ५४ सहकारी साखर कारखान्याच्या व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. यात मातब्बर नेत्यांशी जवळचे संबंध असल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यातील बहुतांश कारखान्यांचे संबंध हे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांचा समावेश असल्याने याला राजकीय आयाम असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नावाने तालुक्यातील उंबरखेड येथील उमेश प्रकाश करपे यांनी पत्र लिहून बेलगंगा सहकारी साखर कारखान्याला खरेदी करतांना झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. विशेष बाब म्हणजे करपे हे भाजपचे शक्ती केंद्रप्रमुख आहेत. यामुळे त्यांनी थेट आपल्याच पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांकडे बेलगंगाबाबत विचारणा केली आहे. 80 कोटी संपत्ती असलेला बेलगंगा साखर कारखाना 39 कोटीत विकला गेला असून यात मोठा घोळ झालेला आहे. याची देखील ईडीमार्फत चौकशी व्हावी ही मागणी त्यांनी केली आहे. तसेच बेलगंगाच्या व्यवहारावर चंद्रकांत पाटील गप्प का आहेत ? हा प्रश्‍न देखील त्यांनी पत्रातून विचारला आहे. हे पत्र त्यांनी समाजमाध्यमातून प्रसारित केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Protected Content