जीएमसीमध्ये ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाची उभारणी

जळगाव प्रतिनिधी | शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सीजन निर्मिती करणारा प्रकल्प उभारण्यात येत असून तो लवकरच कार्यान्वित होणार आहे.

कोरोनाच्या आपत्तीत प्राणवायू हा सर्वात महत्वाचा घटक आहे. बर्‍याच रूग्णांना ऑक्सीजनची आवश्यकता भासत असल्याने जीएमसीच्या आवारात ऑक्सीजनचा साठा करणारी यंत्रणा उभारण्यात आली आहे. यात बाहेरून आणून ऑक्सीजनचा साठा करण्यात येत असून तो रूग्णांसाठी वापरला जात आहे. तथापि, प्राणवायूसाठी बाहेर न जावे लागता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरातच ऑक्सीजन निर्मितीच्या प्रकल्पाला पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा नियोजन मंडळाने मान्यता दिली होती.

या अनुषंगाने जीएमसीच्या परिसरात ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाची उभारणी सुरू करण्यात आलेली आहे. आज या प्रकल्पाच्या इन्स्टॉलेशनचे काम पूर्ण होणार असून चाचण्या पूर्ण झाल्यानंतर येत्या काही दिवसांमध्ये या प्रकल्पातून प्राणवायूची निर्मिती सुरू होणार आहे. सध्या कोरोनाची रूग्णसंख्या कमी झाली असली तरी तिसर्‍या लाटेची शक्यता आहेच. यामुळे भविष्यात येथून तयार झालेला ऑक्सीजन उपयोगात येणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे याचा कोविड आणि नॉन-कोविड या दोन्ही प्रकारातील रूग्णांना लाभ होणार आहे.

Protected Content