ज्ञानेश्वर माळी राज्यस्तरीय उपक्रमशील कलाशिक्षक पुरस्काराने सन्मानित

चोपडा प्रतिनिधी | राज्यस्तरीय उपक्रमशील कलाशिक्षक पुरस्कार २०२१ वितरण समारंभात चोपडा येथील कलाशिक्षक ज्ञानेश्वर माळी यांना उपक्रमशील कलाशिक्षक राज्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.

चोपडा येथील ललित कला केंद्र व अखिल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कलाशिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भगिनी मंडळ चोपडा संस्थाध्यक्षा, राष्ट्रीय महिला आयोग नवी दिल्लीच्या उपाध्यक्षा व समाज नेत्या डॉ.सुशीलाबेन शहा यांच्या ८१ व्या जयंतीनिमित्त रविवार दि .५ डिसेंबर २०२१ रोजी राज्यस्तरीय उपक्रमशील कलाशिक्षक पुरस्कार २०२१ वितरण समारंभ चोपडा येथे संपन्न झाला. यात आर्यन एज्युकेशन सोसायटीचे म.नी.दांडेकर हायस्कूल येथे कार्यरत कलाशिक्षक ज्ञानेश्वर माळी यांना विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी व सेवानिवृत्त चित्रकला व शिल्प निरीक्षक भास्कर तिखे यांच्या हस्ते उपक्रमशील कलाशिक्षक राज्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ५,५०० रुपये रोख, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

चोपडा येथील भगिनी मंडळाच्या सांस्कृतिक सभागृहात संपन्न झालेल्या पुरस्कार वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी भगिनी मंडळाच्या सचिव ऊर्मिलाबेन गुजराथी तर प्रमुख अतिथी म.रा.मुंबईचे चित्रकला व शिल्प निरीक्षक प्रा.संदिप डोंगरे, सरचिटणीस एस.डी..भिरुड, निवृत्त कलाशिक्षक एल झेड.कोल्हे व आर.टी. पवार आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

कलाशिक्षक ज्ञानेश्वर माळी यांनी २००२ पासून पालघर शाळेत रुजू झाल्यापासून एकोणीस वर्षाच्या सेवेमध्ये कला विषयांतर्गत विद्यार्थी केंद्रित सामाजिक व राष्ट्रीय उपक्रम राबविले. तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर स्वतः व त्यांचे विद्यार्थी कला विषयावर आयोजित स्पर्धेत सातत्याने बक्षिसे पटकावत आहेत. परिणामी विद्यार्थीप्रिय हरहुन्नरी, बहुआयामी कलाशिक्षक ज्ञानेश्वर माळी शाळा व संस्थेचे नावलौकिक उत्तरोत्तर वाढवित आहेत .

पालघर रेल्वे स्टेशन सुशोभीकरण यासारख्या सामाजिक उपक्रमात माळींनी कलेद्वारे योगदान दिले आहे. शालेय उपक्रमांतर्गत मकरसंक्रांतीनिमित्त ‘आकाशी झेप घे रे पतंगा.. इजा नको पोहोचवू पक्षांना..’ मतदानाविषयी जनजागृती मोहीम, गणेशोत्सवानिमित्त दरवर्षी पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनविणे कार्यशाळा, ‘ धागा शौर्याचा राखी अभिमानाची ‘ या विषयावर भारतीय सीमेवरील जवानांसाठी रक्षाबंधन निमित्त खास उपक्रम, स्वच्छ भारत सुंदर भारत अंतर्गत स्थानिक शिरगाव समुद्रकिनारा सफाई, गणेश कुंड स्वच्छता अभियान, अशा प्रकारचे राष्ट्रीय, सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम सतत राबवीत असतात.

लॉकडाऊन काळात समाजातील व्यक्तींचे पेन्सिल स्केचेस काढून मिळालेल्या मानधनातून कोरोना संकटासाठी आपत्कालीन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडे ११,१११/- रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. समाजसेवा व राष्ट्रसेवेने झपाटलेल्या कलासक्त श्री.माळी यांनी कोरोना कालावधीत कलाकर्तृत्व सिद्ध करीत सुवर्णसंधीचे सोने केले. लॉकडाऊन काळात साकारलेल्या शंभर रेखाचित्रांचे ‘ शतचित्राणि ‘ भावविभोर चेहऱ्यांचे शतक हे माळींचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले .या पुस्तकातील विविध रेखांकित भावमुद्रा पाहून सामान्य रसिक मंत्रमुग्ध होतात.

पालघर पंचक्रोशीतील छोट्या-छोट्या पाड्यांवरील अशिक्षित पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत पारंपारिक कलेला प्रोत्साहन देऊन ते संवर्धित करतात .विद्यार्थ्यांना स्वखर्चाने शैक्षणिक कला-साहित्य मोफत देऊन शिक्षण प्रवाहात आणतात . एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेची फी भरणे तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गुणगौरव करतात. आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना कलासाहित्य विविध संस्थांतर्फे मोफत मिळवून देतात. विविध कंपन्यांच्या सौजन्याने कलास्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांची कलाभिरुची वाढवितात. हस्ताक्षर सुंदर होण्यासाठी विनामूल्य मार्गदर्शन वर्ग घेतात .कला, कार्यानुभव विषयाला अनुसरून वारली पेंटिंग, ग्लास पेंटिंग, वाळूशिल्प, टाकाऊ पासून टिकाऊ कलाकृती निर्माण करणे असे उपक्रम राबवितात. ते पालघर व ठाणे जिल्ह्यात आयोजित सेमिनार, वेबिनार, रंग कार्यशाळा घेऊन सक्रियतेने साहित्यनिर्मिती करतात. पालघर स्थानिक संस्थांच्या विविध शैक्षणिक,सामाजिक ,सांस्कृतिक स्पर्धांच्या आयोजनातही नेहमी मार्गदर्शक व स्पर्धा परीक्षक म्हणून विनामूल्य योगदान देतात .

कोरोना काळात “शाळा बंद पण शिक्षण सुरू” या उपक्रमांतर्गत कला या विषयावर व्हिडीओ निर्मिती करून गुगल मीट, झूम ॲप्स या तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना अखंड मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना आरोग्य संदर्भीय दक्षतेबाबत सुंदर हस्ताक्षरातील फलक लेखनाने व भित्ति-चित्रांन्वये स्वखर्चाने जनजागृती केली.

चित्रकलेतून केलेल्या मुल्याधिष्ठीत राष्ट्रीय, सामाजिक ,शैक्षणिक कार्याची दखल घेऊन राज्यातील प्रसिद्घ संघटनांनी व संस्थांनी पुरस्कार देवून श्री.माळींना गौरवीत केले . महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघटनेमार्फत ‘आदर्श कला शिक्षक पुरस्कार ‘ ‘ यांसह गुणवंत शिक्षक पुरस्कार ‘, ‘गुणवंत चित्रकला शिक्षक पुरस्कार ‘ आदी पुरस्कार आदींसह कलाक्षेत्रातील समर्पित सेवेबद्दल तालुका, जिल्हा व राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत . लॉकडाऊन काळातील कार्याची दखल घेऊन नुकतेच एस.आर.दळवी फाउंडेशनतर्फे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते ‘ राज्यस्तरीय महाशिक्षक पुरस्कार ‘ देऊन मुंबईला गौरविण्यात आले होते.

कार्यक्रमाप्रसंगी पुणे येथील कलाशिक्षक संघाचे माजी अध्यक्ष, सेवानिवृत्त कलाशिक्षक मल्लिकार्जुन सिद्धगी, पुणे येथील निवड समिती सदस्य हेमा धोत्रे, चोपडा ललित कला केंद्र प्राचार्य राजेंद्र महाजन, प्रा. सुनील बारी, अभियंता संजय भावसार, भारतरत्न डॉ ए पी .जे . अब्दुल कलाम पुस्तक भिशीचे जिल्हाप्रमुख विजय लुल्हे आदी मान्यवर उपस्थित होते.

“राज्यस्तरीय उपक्रमशील कलाशिक्षक पुरस्कार” मिळाल्याबद्दल पालघर संस्थाध्यक्ष अमोद उसपसकर, कार्यवाह गोपीनाथ नागरगोजे, संस्थेचे सी.ई.ओ. अविनाश म्हात्रे, विश्वस्त किरण उमरूटकर, शाळेचे मुख्याध्यापक श्री गावित , शिक्षकवृंद आप्तेष्ट व मित्रमंडळींनी ज्ञानेश्वर माळी यांचे अभिंदन केले आहे.

Protected Content