जीएमसीमधील दिव्यांग बोर्ड दिवाळी सुट्ट्यांमुळे बंद राहणार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील दिव्यांग बोर्ड दिवाळी सुट्ट्यामुळे बंद राहणार आहे. येथील प्राध्यापक संवर्गाला दरवर्षीप्रमाणे हिवाळी सुट्टी असल्यामुळे दिव्यांग बोर्डाची कार्यवाही बंद राहणार आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्र मिळण्याकरिता दिव्यांग बोर्डात कार्यवाही केली जाते. यात बुधवारी वैद्यकीय तपासणी तसेच कागदपत्रांची तपासणी केली जात असते. बोर्डात राज्यभरात गौरविलेली आदर्श अशी कूपनप्रणाली कार्यरत आहे. त्यामुळे बोर्डात पारदर्शीपणा आलेला आहे. विविध दिव्यांगत्व प्रकारात मोडणाऱ्या दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यवाही तज्ज्ञ डॉक्टर्स करीत असतात.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे हंगामी हिवाळी सुट्ट्या सुरु होत असल्यामुळे नोव्हेंबर महिन्यात आलेल्या दिवाळी सुट्टीमुळे व प्राध्यापकांच्या हिवाळी हंगामी सुट्यामुळे दिव्यांग बोर्डाची कार्यवाही बंद राहणार आहे. याबाबत संबंधित यंत्रणेला सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे दिव्यांग बांधवांनी आता पुढील कामकाजासाठी २९ नोव्हेंबर रोजी तपासणी व चौकशीकरिता यावे, अशी माहिती दिव्यांग बोर्डाचे अध्यक्ष डॉ. मारोती पोटे यांनी दिली आहे.

“दिव्यांग बोर्डातील आलेल्या तक्रारीत असे निदर्शनास आले आहे की, बोर्डाच्या अध्यक्षांच्या नावाचा उल्लेख करून बोर्डाबाहेरील अनधिकृत व्यक्ती दिव्यांग प्रमाणपत्र काढून देतो, टक्के वाढ करून देतो अशी बतावणी करीत दिव्यांग बांधवांची गैरव्यवहार करून फसवणूक करीत आहे, असे निदर्शनास आले आहे.  तरी सर्वांना आवाहन करतो की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या दिव्यांग मंडळातील  दिव्यांग प्रमाणपत्र कार्यवाहीसाठी शासकीय फी शिवाय कोणतेही शुल्क आकारले जात नाही. त्यामुळे  कोणीही गैरव्यवहार व भूलथापाना बळी पडू नका. अशा प्रकाराला दिव्यांग मंडळ जवाबदार राहणार नाही. जागृत राहावे”

डॉ. मारोती पोटे, अध्यक्ष,  दिव्यांग मंडळ विभाग.

Protected Content