महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय उच्चतर शिक्षा परिषदेवर कुलगुरूंची नियुक्ती

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांची महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय उच्चतर शिक्षा परिषदेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून या संदर्भात अधिसुचना जारी करण्यात आली आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री हे परिषदेचे अध्यक्ष असतात. या परिषदेवर तीन कुलगुरूंची नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यामध्ये प्रा. माहेश्वरी यांच्या नावाचा समावेश आहे. परिषदेवर महाराष्ट्रातील संलग्नित महाविद्यालयांचे दोन प्राचार्य, कला, विज्ञान-तंत्रज्ञान, सांस्कृतिक, उद्योग, व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य विकास या क्षेत्रातील नऊ तज्ज्ञांचा देखील समावेश आहे. तसेच उच्च व तंत्रशिक्षणाचे प्रधान सचिव व संचालक यांचाही समावेश आहे. परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ तीन वर्षाचा आहे. महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय उच्चतर शिक्षा परिषद हीच महाराष्ट्र राज्यासाठी राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान आणि प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान या योजनांसाठी राज्य उच्च शिक्षण परिषद समजली जाईल. उच्च शिक्षणाचा आराखडा तयार करणे, उच्च शिक्षणाला उद्योगाभिमूख बनविणे, गुणवत्तेत सुधारणा करणे, उच्च शिक्षणाच्या गुणवत्ता सुधारण्यासाठी राज्य शासनाला सल्ला देणे आदी कार्य या परिषदेचे आहे. प्रा. माहेश्वरी यांच्या नियुक्तीमुळे खान्देशाला हा मान मिळाला आहे.

Protected Content