जामनेर येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची जिल्हा बैठक; विविध विषयांवर चर्चा !


जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची जिल्हा बैठक जामनेर येथील छत्रपती शिवाजीनगर येथे पार पडली. या बैठकीत निरीक्षक म्हणून समितीचे राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे उपस्थित होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नंदलाल पाटील होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे मानसिक आरोग्य व्यवस्थापन विभागाचे सहकार्यवाह विश्वजीत चौधरी, जिल्ह्याचे उपाध्यक्ष नाना लामखेडे आणि राजेंद्र बावस्कर, जिल्हा कार्याध्यक्ष प्रल्हाद बोऱ्हाडे, जिल्हा प्रधान सचिव सुनील वाघमोडे उपस्थित होते. चळवळीच्या गीताने बैठकीची सुरुवात झाली आणि प्रल्हाद बोऱ्हाडे यांनी प्रास्ताविक केले.

कार्याचा आढावा आणि आगामी योजना
जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र बावस्कर, नाना लामखेडे यांच्यासह नंदलाल पाटील यांनी आपल्या मनोगतात अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य अधिक वेगाने वाढवण्यासाठी शाखांनी कार्यरत राहण्यावर भर दिला. शहादा येथे झालेल्या विस्तारित राज्य कार्यकारिणी बैठकीचा वृत्तांत विश्वजीत चौधरी यांनी सादर केला. यावेळी जिल्ह्यातील ५ कार्यकर्त्यांना लक्षवेधी कार्यकर्ता पुरस्काराने, तर २ शाखांना सन्मानित करण्यात आल्याबद्दल कौतुक करण्यात आले. तसेच, जिल्ह्यातील ३ कार्यकर्त्यांची राज्य कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही करण्यात आले.

या बैठकीत जिल्ह्यातील विविध शाखांनी त्यांच्या कामांचा आढावा सादर केला. पुढील काळात मानसिक आरोग्य दिन सप्ताहाचे उपक्रम, विवेक वाहिनीचे कार्यक्रम, जिल्ह्यातील शाखा भेटी आणि नवीन शाखा निर्मितीबाबत नियोजन करण्यात आले.

जामनेर शाखेचे कार्याध्यक्ष बी. आर. पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर जिल्हा महिला सहभाग विभागाच्या कार्यवाह शोभा बोऱ्हाडे आणि विश्वजीत चौधरी यांनी आभार मानले. या बैठकीला जिल्हाभरातील विविध शाखांमधील कार्याध्यक्ष, प्रधान सचिव आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीसाठी ॲड. राजू मोगरे, रमेश गायकवाड, जे. डी. पाटील, जाबिर तडवी, सुशीला चौधरी, एन.एस.पाटील, रामदास सोनवणे, भीमराव दाभाडे, तीर्थराज सुरवाडे, बापूसाहेब सुरवाडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.