जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । परीक्षा कोणतीही असो, यश-अपयश येतच असते, मात्र अपयशाने खचून न जाता पुन्हा यशाचा पाठलाग करावा, असे आवाहन मान्यवरांनी आज जळगावात केले. बळीराम पेठ येथील ब्राह्मण समाज कार्यालयात वैश्यवाणी युवा फाऊंडेशनच्या वतीने आयोजित दहावी, बारावी आणि पदवीधर गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते. फाऊंडेशनचे अध्यक्ष चेतन वाणी, उपाध्यक्ष भूषण वाणी आणि सचिव राकेश वाणी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम दुसऱ्या वर्षीही यशस्वीरित्या पार पडला, ज्यात समाजातील मान्यवर आणि विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला.
समाजाने एकोप्याने राहून प्रगती करावी: आ.राजूमामा भोळे
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार सुरेश उर्फ राजूमामा भोळे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले, “शिक्षण हे विकासाचे प्रवेशद्वार आहे आणि वैश्यवाणी युवा फाउंडेशनने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून समाजाला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले आहे, हे अत्यंत कौतुकास्पद आहे. आजचे विद्यार्थी हेच उद्याचे भविष्य आहेत आणि अशा उपक्रमांमुळे त्यांना पुढील वाटचालीस प्रेरणा मिळते. “समाजाने एकोप्याने राहून प्रगती करावी, असे आवाहन करत, पावसाळ्यात प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे संवर्धन करावे, असेही त्यांनी सांगितले.
समाज भूषण पुरस्काराने मान्यवरांचा गौरव
यावेळी जळगाव महानगरपालिकेचे माजी उपमहापौर अनिल अमृत वाणी, पुणे येथील बाल साहित्यिक चिन्मयी शेटे, माजी सैनिक आणि तलाठी संदीप सूर्यवंशी तसेच युवा उद्योजक आणि ऑक्सिमाइन वॉटरचे राकेश निंबा वाणी यांना ‘समाज भूषण पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कारप्राप्त मान्यवरांनी समाजासाठी योगदान देण्याचा संकल्प व्यक्त केला.
चिन्मयी शेटे म्हणाल्या, साहित्य आणि शिक्षणातून समाजाला प्रेरणा देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि या सन्मानामुळे त्यांची जबाबदारी वाढली आहे. राकेश शेटे यांनी ब्रँड तयार करण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि संयम लागतो, तोच गुण विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी ठेवावा असे सांगितले. संदीप सूर्यवंशी यांनी सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेत सातत्याने यश मिळवल्याचे सांगत, सातत्याने प्रयत्न केल्यास कोणतेही लक्ष्य साध्य करता येते असे स्पष्ट केले.
९० गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
या गुणगौरव सोहळ्यात ९० गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि फोल्डर फाईल देऊन गौरवण्यात आले. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना हा सन्मान त्यांच्यासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. यामुळे त्यांना पुढील ध्येये गाठण्यासाठी बळ मिळाल्याचे त्यांनी म्हटले.
फाऊंडेशनचे भविष्यातील उपक्रम व समाज एकजुटीचे आवाहन
प्रास्ताविकात चेतन वाणी यांनी भविष्यात वधू-वर परिचय मेळावा, समाजाचे अधिवेशन आणि ओबीसी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी संपर्क सूची तयार करण्यासारखे विविध उपक्रम राबविले जातील असे सांगितले. सूत्रसंचालन करताना राकेश वाणी यांनी समाज एकजुटीचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फाऊंडेशनचे अध्यक्ष चेतन वाणी, उपाध्यक्ष भूषण वाणी, सचिव राकेश वाणी यांच्यासह मुकेश जाधव, पंकज शेटे, हर्षल वाणी, प्रसाद वाणी, परी वाणी, वसीम खान, जकी अहमद आणि सुनील भोळे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमानंतर सर्वांसाठी फराळची व्यवस्था करण्यात आली होती. निकिता शेटे यांनी आभार प्रदर्शन केले. हा गुणगौरव सोहळा वैश्यवाणी समाजातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासोबतच समाज एकजुटीसाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरला.