शिक्षकांच्या पतपेढीत गैरव्यवहार उघड; तत्कालीन पदाधिकारी व कर्मचाऱ्यांवर ठपका


भुसावळ-लाईव्ह टेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ येथील प्राथमिक शिक्षकांची नूतन सहकारी पतपेढीत १ कोटी ९३ लाख ८६ हजार २५० रुपयांचा मोठा अपहार झाल्याचे उघड झाल्याचे समोर आले आहे. सभासदांची नावे वापरून गैर-सभासदांच्या खात्यांवर ही रक्कम वर्ग करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पतपेढीचे सभापती प्रदीप सोनवणे यांनी भुसावळ शहर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे.

मागील एप्रिल महिन्यात पतपेढीची निवडणूक होऊन मे महिन्यात नूतन कार्यकारी संचालक मंडळ अस्तित्वात आले होते. सभापती प्रदीप सोनवणे आणि त्यांच्या सोबत उपसभापती व सर्व कार्यकारी मंडळ सदस्यांनी कामकाजाला सुरुवात करताच, पहिल्या कर्ज वितरणात सन २०२३-२४ आणि २०२४-२५ या दोन आर्थिक वर्षांत झालेला हा घोटाळा समोर आणला आहे.

या अपहारात संस्थेचे लिपिक अभिजीत दत्तात्रय तायडे, चिटणीस व हिशोबनीस राजू लालू गायकवाड, आरटीजीएस फाइल तयार करणारे कर्मचारी हितेश संजय नेहेते, तत्कालीन सभापती गंगाराम सीताराम फेगडे व हरिश्चंद्र काशिनाथ बोंडे, तसेच ज्या गैर-सभासद व्यक्तींच्या खात्यावर रक्कम जमा झाली त्यात निलेश रविंद्र महाजन, हर्षल सुनिल गावंडे, कुणाल संजय महाजन, हर्षल रविंद्र चौधरी, रूपाली अभिजीत तायडे यांचा समावेश आहे. अशा एकूण १० व्यक्तींविरुद्ध १७ जून २०२५ रोजी फिर्याद देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, अद्याप पोलिसांमार्फत याची चौकशी सुरू झालेली नाही.

२२ जून २०२५ रोजी झालेल्या कार्यकारी मंडळाच्या सभेत, या अपहारातील दोषी कर्मचारी आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या १० कर्मचाऱ्यांवर (राजू लालू गायकवाड, पंकज मोतीराम ढाके, हितेश संजय नेहेते, जितेंद्र सुधाकर फेगडे, हितेंद्र अमोल वाघुळदे, राजेश देविदास लहासे, राहुल लक्ष्मीकांत चौधरी, अभिजीत दत्तात्रय तायडे, अजहरुद्दीन राजेंद्र तडवी, पंकज भागवत चौधरी) बडतर्फ करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला असून, त्यांना अंतिम कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पतपेढीचे लेखापरीक्षण वेळेवर न झाल्याने किंवा झालेल्या लेखापरीक्षणास अतिविलंब झाल्याने हा अपहार घडल्याचे दिसत आहे. सन २०२०-२१ ते २०२४-२५ पर्यंत लेखापरीक्षण झालेले नसल्याने, आणि २०२०-२१ चे लेखापरीक्षण संशयाच्या भोवऱ्यात असल्याने, त्या काळातील लेखापरीक्षण शासकीय लेखापरीक्षकामार्फत करण्यासाठी ९ जून २०२५ रोजी उपनिबंधक आणि लेखापरीक्षक सहकारी संस्था, जळगाव यांच्याकडे प्रस्ताव सादर केला आहे.

पतपेढीचा कारभार हाती घेतल्यापासून सहकार, लोकसहकार गटाने निवडणुकीत दिलेल्या वचननाम्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न सभापती, उपसभापती व सर्व संचालक मंडळाने केला आहे. यात दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई आणि फौजदारी गुन्हे दाखल करणे, तसेच कर्ज वितरणातील नंबर सिस्टिम बंद करणे ही वचने पहिल्या दोन महिन्यांत पूर्णत्वास आली आहेत. आज रोजी एकही कर्जाचा अर्ज प्रलंबित नाही आणि पतपेढी कर्ज देण्यासाठी सक्षम आहे. त्यामुळे सभासद बांधवांनी कुठल्याही अफवांना बळी न पडता, पतपेढीवर विश्वास ठेवण्याचे आवाहन सभापती, उपसभापती व संचालक मंडळाने केले आहे.

सभापती प्रदीप सोनवणे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “ही पतपेढी शिक्षक सभासद बांधवांची माय माऊली आहे, कोणत्याही चुकीच्या प्रवृत्तीला पाठीशी घातले जाणार नाही, येत्या काळात पतपेढीला गतवैभव प्राप्त करून देण्यास मी व माझे संचालक मंडळ बांधील आहे.”