Home Cities जळगाव जिल्हा कारागृहात महापुरुषांच्या जयंती उत्साहात

जिल्हा कारागृहात महापुरुषांच्या जयंती उत्साहात


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव, दि. 16 : जळगाव जिल्हा कारागृहात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संयुक्त कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सामाजिक ऐक्य, प्रेरणा आणि संस्कारांचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमात कारागृहातील अधिकारी, कर्मचारी तसेच बंदी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

सकाळी ७.३० ते १०.३० या कालावधीत पार पडलेल्या या विशेष कार्यक्रमात विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कारागृहातील काही बंदी बांधवांनी तसेच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून भक्ती गीतांचे सुरेल गायन सादर केले. देशभक्ती, समाजप्रबोधन आणि महान व्यक्तिमत्त्वांच्या कार्याचा गौरव करणाऱ्या गीतांनी संपूर्ण परिसर भारावून गेला होता.

याशिवाय, काही बंदी बांधवांनी गाण्यांच्या तालावर नृत्य सादर करून आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. या कार्यक्रमामुळे कारागृहात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून बंदी बांधवांना प्रेरणा आणि नवचैतन्य मिळाल्याचे दिसून आले.

कार्यक्रमास प्रभारी अधीक्षक डी.जी. चव्हाण, वरिष्ठ तुरुंगाधिकारी सी.व्ही. तायडे, तुरुंगाधिकारी दिलीपसिंग गिरासे यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी बंदी बांधवांच्या सहभागाचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे सामाजिक मूल्यांची जपणूक होते, असे मत व्यक्त केले.


Protected Content

Play sound