जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक कार्यवाहीचे जिल्हाधिकाऱ्‍यांचे आदेश

जळगाव प्रतिनिधी । कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी तत्काळ कठोर कार्यवाहीचे आदेश आज २२ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सहकार, परिवहन, अन्न व औषध प्रशासन आणि रेल्वे विभागास दिले. 

जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रभाव नियंत्रणात आणण्यासाठी करावयाच्या उपाययोजना संदर्भात जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी या विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठक घेतली. या बैठकीस जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवाई, उप प्रादेशिक परिवहन  विभागाचे महेश देशमुख, अन्न व औषध प्रशासन विभागाचे वाय के बेंडकुळे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाचे प्रतिनिधी ए. के पाठक, महानगर पालिकेच्या अप्पर आयुक्त विद्या गायकवाड, डॉ. राम रावलाणी आदी उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी राऊत म्हणाले की, बाजार समितीमध्ये सकाळी घाऊक खरेदीदाराबरोबरच किरकोळ खरेदीदार गर्दी करतात ती रोखण्यासाठी सहकार विभागाने कडक कार्यवाही करावी तसेच परिवहन विभागाने विनामास्क प्रवाशी आढळल्यास कार्यवाही करावी.  एस. टी. महामंडळाच्या तसेच खाजगी बस, रिक्षांमधून जादा प्रवासी प्रवास करतात. अनेक प्रवाशी मास्क न लावता प्रवास करतात त्यांच्यावर कडक कारवाई करावी, रेल्वे विभागाने अमरावती, अकोला, मुंबई,  पुणे व नागपूर या जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांची माहिती उपलब्ध करुन द्यावी. तसेच रेल्वे गाडीतून प्रवास करतांना सोशल डिस्टन्सींग पाळले जात आहे की एकाच ठिकाणी गर्दी  करुन प्रवासी प्रवास करीत आहे. हे तपासावे, अन्न व औषध विभागाने गर्दी  होणाऱ्या उपहारगृहात तपासणी करावी, गर्दी होणारे ढाब्यांवर तपासणी करावी.  

ग्राहकांना समोरासमोर न बसविता एक दिशेने बसवून सोशल डिस्टन्सींग पाळावे. यावेळी जळगाव महापालीकेने तपासणी केलेल्या कार्यवाहीची माहिती अप्पर आयुक्त विद्या गायकवाड यांनी बैठकीत दिली. यात 377 विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली, 14 मंगल कार्यालये, 15 खाजगी क्लासेसवर ही कार्यवाही करण्यात आल्याची माहिती त्यांनी बैठकीत दिली. डॉ. रावलाणी यांनी आरोग्य विषयक केलेल्या तयारीची माहिती दिली.

 

Protected Content