हरताळा येथे शेतकऱ्यास ई-पीक ॲपद्वारे नोंदणीकृत सातबारा वितरीत

मुक्ताईनगर प्रतिनिधी । तालुक्यातील हरताळा येथे ई-पिक ॲपद्वारे पीक पेरा नोंदणीकृत गावातील पहिला सात बारा (७/१२) शेतकरी गोपाळ शेळकी यांना आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांचे हस्ते वितरित करण्यात आला आहे. 

प्रसंगी सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते अनंतराव देशमुख, सरपंच दिपक कोळी, पंढरी मुलांडे, सोपान तायडे, सोपान दांडगे, शेख शमीद, गणपत कोळी, दिलीप दांडगे, प्रदीप काळे, तलाठी एस. एच. बोरटकर यांचे सह गावातील शेतकरी उपस्थित होते.

ई-पीक पाहणी प्रकल्प हा शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून यामध्ये शेतकरी त्यांच्या मोबाईल ॲपमधून आपल्या पीक पेऱ्याची माहिती, जलसिंचनाची साधने, पिकाची परिस्थिती, बांधावरील झाडे, पडिक क्षेत्र इत्यादी नोंदी स्वत: घेऊन त्यांचे छायाचित्र अपलोड करू शकतात व संबंधित तलाठी यांचे लॉगीनवरून त्याला मान्यता मिळाल्यानंतर ही माहिती वेबसाईटवर अद्ययावत करण्यात येते. हे ॲप हाताळण्यासाठी अत्यंत सोपे असून ॲन्ड्राॅईड फोनवरून मराठी भाषेमधून माहिती भरता येते व एका मोबाईल क्रमांकावरून २० शेतकऱ्यांची माहिती अद्ययावत करता येते. सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पीक पेऱ्याची माहिती अद्ययावत करावी, असे आवाहन तलाठी एस. एच. बोरटकर यांनी केले.

Protected Content