यावल (प्रतिनिधी) येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामुळे परीसरातील रुग्णांमध्ये नाराजी व्यक्त होत असून आरोग्य विभागाने यावर त्वरित उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
या संदर्भात मिळालेली माहीती अशी की, यावल येथील ग्रामीण रुग्णालयात मागील काही दिवसांपासुन येथे कार्यरत असलेल्या तिघा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या नियमित होणाऱ्या हस्तक्षेपाला कंटाळुन येथील ग्रामीण रुग्णालयातुन आपली बदली करवून घेतली आहे. त्यामुळे येथे आता रुग्णांना नियमित आरोग्य सेवा देण्यासाठी कायमचे वैद्यकीय अधिकारी नसल्याने यावल शहरातील लहान मुलांसह वयोवृद्ध रुग्ण आणि महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. येथे कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नसल्याने शालेय आरोग्य सेवेतील वैद्यकीय अधिकारी डॉ.शबाना तडवी व डॉ.आमीर तडवी हे वेळ काढुन रुग्णांना अतिरीक्त सेवा देण्याचे कार्य करीत आहेत. मात्र ते दोन ठिकाणचे कार्य सांभाळत असल्याने वेळेवर ग्रामीण रुग्णालयात सेवा देणे त्यांना अडचणीचे होत आहे. रूग्ण तपासणी व उपचाराची वेळ सकाळी ९.०० वाजेपासुनची असतांना दोन-दोन तास रुग्णांना वैद्यकीय अधिकाऱ्यांची वाट पहावी लागते. त्यामुळे प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे, तरी संबंधितांनी याचा गांभीर्याने विचार करून आरोग्य सेवा सुरळीत करावी, अशी अपेक्षा रुग्णांकडून व्यक्त होत आहे.