शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात २०० दिव्यांगांची तपासणी

ऑक्टोबरपासून कुपनची संख्या वाढविली

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ऑक्टोबर महिन्यापासून कुपन संख्या २०० वरून २५० करण्यात आली आहे. आता दि. १० ऑक्टोबरचे कुपन कार्यालयीन वेळेत वितरित करण्यात येत आहे.

बुधवारी ४ मे रोजी दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्याबाबतचे कामकाज झाले. २०० लाभार्थ्यांनी उपस्थिती देऊन प्रमाणपत्र मिळण्याबाबतची कार्यवाही पूर्ण केली. आता ऑक्टोबर महिन्यापासून कुपन संख्या २०० वरून २५० करण्यात आले असून आता १० ऑक्टोबरचे कुपन कार्यालयीन वेळेत वितरित केले जात आहे.

ज्या दिव्यांग बांधवानी ४ मे रोजीचे कुपन घेतले होते अशा २०० दिव्यांगांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी सकाळी ९ ते १ वाजेदरम्यान करण्यात आली. उपअधिष्ठाता तथा दिव्यांग मंडळाचे अध्यक्ष डॉ. मारुती पोटे, मंडळाचे सचिव तथा वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांच्यासह तज्ज्ञ डॉ. योगेंद्र नेहते, डॉ. पूर्वा मणेरीकर, डॉ. विनोद पवार, डॉ.श्रद्धा महाडिक, डॉ. गिरीश राणे, डॉ. निशी शहा यांनी दिव्यांगांची तपासणी केली. कर्मचारी चेतन निकम, दत्तात्रय पवार,विशाल दळवी, आरती दुसाने, विश्वजीत चौधरी, विशाल पाटील, राकेश खंडागळे यांनी सहकार्य केले.

 

प्रमाणपत्र मिळण्याबाबतची प्रक्रिया –

दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी शासकीय संकेतस्थळ (www.swavlambancard.in)  येथे जाऊन (Apply for Disability certificate & UDID card) या लिंकवर जाऊन अर्ज भरणे आवश्यक आहे. तेथे प्रमाणपत्र नूतनीकरणची देखील लिंक उपलब्ध आहे. या अर्जाची प्रिंट काढून दिव्यांग विभागाच्या कार्यालयातून बुकिंग कुपन घ्यावे. कूपनवर दिलेल्या तारखेला अर्जासह आधारकार्ड, रेशनकार्ड, पासपोर्ट २ फोटो व जुने दिव्यांग प्रमाणपत्र तथा संबंधित कागदपत्र घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात लाभार्थ्यांनी उपस्थित राहावे.

दिव्यांग मंडळाच्या अध्यक्षांचे आवाहन –

दिव्यांग बांधवांच्या प्रमाणपत्र मिळण्याबाबतची कार्यवाही अत्यंत पारदर्शकपणे पार पडत आहे. त्यांना ऑनलाईन भरलेला फॉर्म दाखवून कुपन दिले जाते. कूपनवरील तारखेला वैद्यकीय तपासणी केली जाते. त्यानंतर ऑनलाईन प्रमाणपत्र मिळण्याची कार्यवाही सुरू होते. हि प्रक्रिया पारदर्शक आहे. तरीही काही खाजगी व्यक्ती दिव्यांग बांधवांकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक करीत असल्याचे मंडळाच्या निदर्शनास आले आहे. जिल्हाभरातील दिव्यांग बांधव याबाबतचे दुःख मंडळात मांडतात. त्यामुळे, कोणत्याही दिव्यांग बांधवाने कुठल्याही अनधिकृत इसमाशी आर्थिक व्यवहार करू नये, त्यास मंडळ जबाबदार राहणार नाही. प्रमाणपत्र मिळण्याबाबत काही शंका असतील तर त्या मंडळात सांगाव्यात, त्याचे निरसन केले जाईल. असे आवाहन दिव्यांग मंडळाचे अध्यक्ष तथा उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!