जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून लाभार्थ्यांना केवळ आर्थिक मदत देण्यापुरते मर्यादित न राहता त्यांना सक्षम उद्योजक म्हणून घडविण्यावर भर देण्यात येत आहे. यासाठी डिजिटल साधनांचा प्रभावी वापर करत विविध आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
महामंडळाच्या अधिकृत पोर्टलवर सुरू करण्यात आलेल्या बिझनेस प्रमोशन (Marketing Tab) सुविधेमुळे लाभार्थ्यांना त्यांच्या उत्पादनांची माहिती, छायाचित्रे, किंमत व संपर्क तपशील अपलोड करण्याची संधी मिळत आहे. विशेष म्हणजे, या प्लॅटफॉर्मवर आतापर्यंत २७,५०० हून अधिक व्यवसायांची नोंदणी झाली असून, स्थानिक उत्पादनांना डिजिटल बाजारपेठ मिळत आहे. “लोकल ते ग्लोबल” या संकल्पनेला यामुळे मोठी चालना मिळत आहे.

तसेच, Webinar, YouTube आणि Podcast यांसारख्या माध्यमांद्वारे व्यवसाय व्यवस्थापन, डिजिटल मार्केटिंग, ग्राहक सेवा आणि आर्थिक नियोजन या विषयांवर प्रशिक्षण दिले जात आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील उद्योजकांनाही या सुविधांचा मोठा लाभ होत आहे.
याशिवाय DigiLocker सेवेच्या समावेशामुळे कागदपत्र पडताळणी प्रक्रिया अधिक सुलभ व जलद झाली आहे. भविष्यात Payment Gateway तसेच MAHA-ID आणि UIDAI यांचे एकत्रीकरण करण्याची तयारी सुरू असल्याचेही सांगण्यात आले.
या सर्व उपक्रमांमुळे लाभार्थ्यांना व्यवसाय वृद्धीसाठी सर्वंकष पाठबळ मिळत असून, अधिकाधिक लाभार्थ्यांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे जिल्हा समन्वयक दिपक बोरसे यांनी केले आहे.



