धोकादायक उच्चदाब वीज वाहिनी हटविण्याची मागणी

655307 powersector 022618

रावेर (प्रतिनिधी)। येथील सावदा रोडलगत असलेल्या अष्टविनायक नगर व परिसरातील रहिवासी वस्तीतून गेलेल्या उच्चदाब वीज वाहिनी धोकादायक ठरत असून या वीज वाहिनीमुळे या परिसरात भविष्यात मोठी दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ही वीज वाहिनी हटविण्याची मागणी या भागातील रहिवाशांनी केली आहे.

याबाबत माहिती अशी की, येथील उटखेडा रोडवरील सबस्टेशन येथून ११ के.व्ही. तामसवाडी फिडरची उच्च दाबाची वीज वाहिनी शहरालगत असलेल्या अष्टविनायक नगर मधील गट क्रमांक ११४६ व या परिसरातील रहिवासी कॉलन्यामधून गेलेली आहे. पूर्वी हा भाग शेतीच्या वापरासाठी होता. परंतु शहराचा विस्तार वाढत जाऊन २५ ते ३० वर्षापासून या ठिकाणी कॉलन्या अस्तित्वात येऊन तेव्हापासून हा संपूर्ण भाग रहिवासी प्रयोजनार्थ झालेला आहे. मात्र शेती शिवार असतांना या गटातून व रहिवासी वस्त्यांमधून गेलेल्या तामसवाडी फिडर उच्च दाबाच्या वीज वाहिनीमुळे अष्टविनायक नगर व परिसरात राहणाऱ्या रहिवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.

गतकाळात या वीज वाहिनीमुळे विजेचा तीव्र धक्का बसल्याने एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडलेली आहे. तर मागील वर्षी २०१८ मध्ये याच वीज वाहिनीच्या तारा तुटून एक रहिवाशी महिला व बांधकाम करणारे ४ ते ५ मजूर थोडक्यात बचावले होते. अशा घटना या वीज वाहिनीमुळे आतापर्यंत अनेक वेळा घडलेल्या असून भविष्यात तामसवाडी फिडरवर एखादी मोठी दुर्घटना घडण्याची व त्यात जिवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या फिडरवर वारंवार घडणाऱ्या घटना व रहिवाशी वस्तीचा विचार करून तामसवाडी फिडर ही उच्च दाबाची वीज वाहिनी अष्टविनायक नगर व परिसरातून त्वरित हटविण्यात यावी अशी मागणी अष्टविनायक नगर श्रीकृष्ण नगर, उटखेडा रोड व या भागातील रहिवाशांनी कार्यकारी अभियंता यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. उच्च दाबाच्या वीजवाहिनीपासून रहिवाशांना असलेला धोका लक्षात घेऊन ही वीज वाहिनी हटविण्यासाठी खासदार रक्षा खडसे व आमदार हरिभाऊ जावळे यांनी कार्यवाही करण्याची मागणी त्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

Protected Content