अमळनेर : ईश्वर महाजन
होळी सणाला होणारी बेसुमार झाडांची तोडणी व त्या बरोबर रंग पंचमीला होणारी पाण्याची नासाडी व रासायनिक रंगांचा दुष्परिणाम याचा विचार करून पारोळा तालुक्यातील धाबे या गावात गेल्या सहा वर्षापासुन ‘एक गाव एक गणपती’ बरोबरच ‘एक गाव एक होळी’, पर्यावरण पुरक इको फ्रेन्डली होळी साजरा करण्याची परंपरा या वर्षीही कायम आहे. त्याबाबत शाळेचे विदयार्थी व गावकरींनी तयारी सुरु केली आहे.
धाबे या गावातील शाळेचे महाराष्ट्र शासन जिल्हा व राज्य आदर्श शिक्षक व पर्यावरण रत्न पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे व शाळेचे वरीष्ठ शिक्षक पारोळा तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष गुणवंतराव पाटील यांनी अनेक शालेय उपक्रमांबरोबर सामाजिक उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. सण, उत्सव, जयंती, पुण्यतीथी यांच्या माध्यमाध्यमातुन विदयार्थी व नागरिकांमध्ये जनजागृती करीत आहेत. प्रत्येक सण उत्सवाला गावातील वीर बजरंग एकलव्य ग्रुपचे सदस्य, शिक्षक व गावकरी संपूर्ण गाव परिसराची स्वच्छता करतात. ती यावेळीही केली आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांनी गाईच्या शेणापासुन नारळ,लहान लहान गोवऱ्या, गोल गोवऱ्यांच्या माळा, त्रिकोणी चौकोनी गोवऱ्या मोठया प्रमाणात बनविल्या असून गावातील महिलांनीही शक्य तेवढया गोवऱ्या तयार केल्या आहेत. अगोदर कचरा, प्लास्टिक, गुटका, तंबाकु, वीडी सिगारेट यांची होळी केली जाईल.
या होळी व्यसनांना जाळुन टाकण्याची प्रतिज्ञा घेतली जाते. नंतर गोवऱ्या, कपाशी व तूरच्या काडया, थोडे गावराणी तुप, कापुर, लवंग व औषधी वनस्पती, वड पिंपळ अंबा उंबर यांच्या सुकलेल्या काड्या ज्यांना आपण समिधा म्हणतो, सुकलेले नारळ हे सर्व जाळुन एक शुद्ध व पवित्र वातावरण निर्माण करणारी होळी केली जाते. कुठल्याही प्रकारची वृक्षतोड व लाकूड जाळले जात नाही. होळीच्या दुसऱ्या दिवशीही कुठलेही रासायनिक रंग न वापरता पळसच्या फुलांपासुन नैसर्गिक रंग तयार करून वापरला जातो. एक इको फ्रेन्डली व पर्यावरण पूरक होळी साजरी करण्यात येणार आहे.
यासाठी शाळेच्या विदयार्थ्यांनी गाईच्या शेणाचा वापर करून होळीसाठी बनविलेल्या वस्तु कार्यानुभव विषयाला चालनाही देतात व त्यांना स्वनिर्मितीचा आनंद मिळुन पर्यावरण रक्षणाची जागृती त्यांच्यामध्ये निर्माण होते. शाळेचे मुख्याध्यापक साळुंखे यांनी सर्वत्र एक गाव एक होळी हा उपक्रम साजरा करण्याची मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करणारे निवेदन तहसिलदार पारोळा यांना आपल्या निसर्ग मित्र समिती पारोळाच्या सदस्यांसोबत दिले आहे. तरी या पर्यावरण रक्षण, जतन व संवर्धनाच्या कार्यात सर्वांनी सहभाग नोंदवावा अशी विनंती केली आहे.