एकही शेतकरी कापूस मोजणीपासून वंचित राहणार नाही – ना. गुलाबराव पाटील

धरणगाव प्रतिनिधी- सरकार अडचणीत असूनही कापसाची शासकीय खरेदी सुरू असून एकही शेतकरी कापूस मोजणीपासून वंचित राहणार नसल्याची ग्वाही आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. ते धरणगाव येथे शासकीय कापूस खरेदीच्या शुभारंभाप्रसंगी बोलत होते.

धरणगाव येथील कृष्णा कॉटन व एस. के. कॉटन जिंनीग प्रेसिंग मिल मध्ये शासकीय कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी. जी. पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, राष्ट्रवादीचे नेते तथा पणनेचे संचालक संजय पवार, पंचायत सभापती मुकुंदराव नन्नवरे, जि. प. सदस्य गोपाल चौधरी, आशिष गुजराथी, शेतकी संघाचे अध्यक्ष पाटील, तहसीलदार देवरे, सहाय्यक उपनिबंधक बारी , गजानन पाटील, मच्छींद्र पाटील, माजी नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी, नगरसेवक पप्पू भावे, राजेंद्र महाजन, रमेश पाटील, जीवन बयास, प्रेमराज पाटील, भानुदास विसावे, राहुल पारीख, मूर्तिजा बोहरी यांच्यासह जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कापूस खरेदी केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी मार्गदर्शन करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, आपण सर्वजण कोरोनाच्या विशिष्ट परिस्थितीमधून मार्गक्रमण करत आहोत. कोरोनामुळे अनेक अडचणी असल्या तरी सरकारने कापूस खरेदी सुरू केली आहे. धरणगाव येथे कापूस खरेदी केंद्र सुरु झाल्यामुळे आपल्या भागातील शेतकर्‍यांना याचा फायदा होणार आहे. कापूस उत्पादक शेतकर्‍याच्या कापसाला चांगला भाव मिळून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर शेतकर्‍यांचे कोणतेही नुकसान होणार नाही, व कापसाची शासकीय खरेदी सुरू असून एकही शेतकरी कापूस मोजणीपासून वंचित राहणार नसल्याची ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली.

दरम्यान, धरणगाव येथे औद्योगिक वसाहत स्थापन करण्यासाठी आपला पाठपुरावा सुरू असून याबाबत बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

याप्रसंगी आशिष गुजराथी व संजय पवार यांनी आपल्या मनोगतातून शेतकर्‍यांनी कापूस खरेदी प्रक्रियेत नियमांचे पालन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. एम. पाटील यांनी केले तर आभार जिनिगचे मालक व नगरसेवक राजेंद्र महाजन यांनी मानले.

Protected Content