जळगाव प्रतिनिधी । लग्न झाल्यापासून सतत आईला वडीलांनी काहीही कारण नसतांना मानसिक व शारिरीक त्रास दिला जात असल्याने आईसह दोन मुली व एक मुलगा अशा चौघांनी स्वतःला घरात कोंडून घेत गेल्या 9 दिवसांपासून अन्नत्याग केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास समोर आला. पित्याने न्यायालयात तक्रार केली, त्यानुसार न्यायालयाने वारँट बजावले, न्यायालयाच्या आदेशाने या वॉरंटनुसार एमआयडीसी पोलिसांनी चौघांची तिघांना ताब्यात घेवून न्यायालयात हजर केले. दरम्यान पित्याने मुलांली मला घरात न घेता, स्वतः कोंडून घेत, अन्नत्याग केल्याचे सांगितले आहे, तर आईसह मुलांनी मात्र आम्ही स्वतः कोंडून घेतले नाही, फक्त घराच्या बाहेर निघाले नाही, तसेच अन्नत्याग नव्हता, उपवास होता, तसेच थोडे थोडे जेवण केल्याची माहिती दिली असून वडील खोटे बोलत असल्याचा आरोप केला आहे.
पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात दिनकर रामदास पाटील (वय 62) हे पत्नी वैशाली पाटील (वय-53), मुलगा उमाकांत दिनकर पाटील (वय-32), मुलगी रेणुका दिनकर पाटील (वय-29) तसेच विवाहित मुलगी राजश्री यशदिप चव्हाण (वय- 35) या कुटुंबासह वास्तव्यास आहे. दिनकर रामदास पाटील यांची एमआयडीसी परिसरात रेणुका इंजिनिअरींग नावाची कंपनी असून मुलगा उमाकांत इंजिनिअर असल्याने तोही कामात मदत करतो. मात्र आईला होणाऱ्या त्रासामुळे तो गेल्या दोन महिन्यांपासून घरीच आहे.
दिनकर पाटील यांचा मुलगा उमाकांत पाटील व मुलगी रेणुका यांनी दिलेल्या माहितीनुसार, असे की लग्न झाल्यापासून आई वैशाली यांना वडील दिनकर पाटील हे कुठल्या ना कुठल्या कारणावरुन त्रास देतात, भांडण करतात, या भांडणातून त्यांनी अनेकदा आईला वडीलांनी मारहाणही केली, काही दिवसांपूर्वीही अशाच प्रकारे भांडण झाले. अनेकदा त्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन तोच तोच त्रास वडीलांकडून आईला दिला जात आहे, त्यांच्या भांडणाच्या ऑडीओ, तसेच व्हिडीओ क्लीप्सही आमच्याकडे असल्याचे मुलांचे म्हणणे आहे. या त्रासामुळे आम्ही नऊ दिवसांपासून घरातून बाहेर पडलो नाही, मात्र थोडे थोडे रोज जेवण केले असेही त्यांनी बोलतांना सांगितले.
मेन गेटला कुलूप व घरातील दरवाजाही बंद असल्याने गेल्या नऊ दिवसांपासून दिनकर पाटील बाहेर आहेत. घरात मुलांनी तसेच पत्नीने स्वतः कोंडून घेतले, तसेच अन्नत्याग केल्याने त्यांची प्रकृती खालावून दुर्घटना घडू नये अशी तक्रार करत दिनकर पाटील यांनी न्यायालयात धाव घेतली, तसेच त्यांना ताब्यात घ्यावे असे वाँरंट मिळविले. न्यायालयाच्या आदेशाने तसेच वाँरट नुसार एमआयडीसीचे पोलीस निरिक्षक रणजीत शिरसाठ यांनी पोलीस उपनिरिक्षक ससाणे, कर्मचारी, मिनाक्षी घेटे, दिनकर खैरनार, आशा पांचाळ, मालती वाडीले, जितेंद्र राजपूत यांच्यासह रुग्णवाहिका, व शासकीय वाहन घेत पंचमुखी हनुमान नगरातील दिनकर पाटील यांचे घर गाठले. घर तसेच गेट बंद असल्याने कर्मचारी गेटवरुन आतमध्ये गेले. यानंतर घरातील वैशाली यांच्यासह मुलांना विनंती केली. व त्यानुसार दरवाजा उघडला. तब्बल एक ते दीड तासानंतर वैशाली यांच्यासह मुले न्यायालयात येण्यासाठी तयार झाले. त्यांची प्रारंभी जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यात आली. यानंतर जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले.