जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्राच्या संतपरंपरेला उजाळा देणाऱ्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने जळगाव तालुक्यातील कंडारी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत एक आगळावेगळा भक्तिमय आणि सांस्कृतिक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. पालखीसह ग्रंथदिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अध्यात्म, वाचनसंस्कृती आणि परंपरेचे सुंदर दर्शन घडवले.
या कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या प्रांगणात श्री विठ्ठल-रखुमाईच्या प्रतिमेची पूजा करून करण्यात आली. त्यानंतर टाळ, मृदंगाच्या गजरात आणि “ज्ञानोबा-तुकाराम”च्या अभंगांनी गगनभेदी भक्तिपर्यावरण तयार झाले. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत शाळेच्या आवारात बालदिंडी काढली. श्रीविठ्ठलाची वेशभूषा साकारलेल्या कृष्णा भील याच्या भूमिकेने उपस्थितांची मने जिंकली. ही वेशभूषा सजवण्यात मंजुषा पाठक आणि सुनंदा रोझदकर यांचे मोलाचे योगदान होते.
विद्यार्थ्यांनी वारकरी परंपरेतील पोशाख परिधान केला होता, तर कंडारी येथील पंचरंगी भजनी मंडळाच्या सदस्यांनी पारंपरिक भजने सादर करत दिंडीत रंग भरले. गोपाळ रिवाजकर, रवी धनगर, प्रभाकर धनगर, राजू सोनवणे, गोलू धनगर, विठोबा धनगर यांच्या भजनी सेवेमुळे वातावरण पूर्णतः भक्तिसागरात न्हालं.
दिंडीतील विशेष आकर्षण म्हणजे श्रीविठ्ठलाच्या प्रतिमेसह सजवलेली पालखी आणि त्यासोबतची ग्रंथदिंडी. या पालखीत ‘बालभारती’च्या पुस्तकांना स्थान देण्यात आले होते, ज्यातून वाचन संस्कृतीचा जागर करण्यात आला. विद्यार्थिनींनी पारंपरिक तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन मिरवणूक काढली. हा उपक्रम धार्मिकतेपुरता मर्यादित न राहता वाचन, संस्कार, कला आणि सामाजिक एकात्मतेचे शिक्षण देणारा ठरला.
कार्यक्रमाच्या समारोपाला शाळेच्या प्रांगणात सामूहिक अभंगगायन, नामस्मरण, पावली आणि फुगडी खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पारंपरिक आनंदोत्सव साजरा केला. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेत हा कार्यक्रम संस्मरणीय केला. या कार्यक्रमात मंजुषा पाठक, राजाराम पाटील, सुनंदा रोझदकर, सविता निंभोरे, ज्योती वाघ, डॉ. जगदीश पाटील, विनोद जयकर, गणेश तांबे, शाम चिमणकर आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
या उपक्रमाविषयी बोलताना ज्येष्ठ शिक्षिका मंजुषा पाठक म्हणाल्या, “या उपक्रमाचा उद्देश केवळ धार्मिकतेपुरता मर्यादित नसून, विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, वाचनाची आवड, परंपरेचे भान आणि समाजाशी जोड निर्माण करणे हा आहे. चालतीबोलती दिंडी ही विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष अनुभवांची एक शाळा ठरते.”