जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सुप्रिम कॉलनीतील माहेर असलेल्या विवाहितेला ५० हजारासाठी छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सोमवारी ५ सप्टेंबर रोजी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुप्रिम कॉलनी येथील माहेर असलेल्या राजनंदीनी सूपडू सपकाळे (वय-२३) यांचा विवाह आव्हाणे ता. जळगाव येथील सूपडू अनिल सपकाळे यांच्याशी रितीरिवाजानुसार झालेला आहे. लग्नाचे सुरूवातीचे दिवस चांगले गेल्यानंतर पती सूपडू सपकाळे याने कर्ज फेडण्यासाठी माहेरहून ५० हजार रूपयांची मागणी केली. विवाहितेने पैसे आणले नाही म्हणून विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच सासू, दिर यांनी देखील पैशांसाठी तगादा लावला. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. सोमवारी ५ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात पती सूपडू अनिल सपकाळे, सासू उषाबाई अनिल सपकाळे, दीर अमोल अनिल सपकाळे आणि विशाल अनिल सपकाळे सर्व रा. सुप्रिम कॉलनी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय धनगर करीत आहे.