४२ लाखांचा गुटखा जप्त : दोघांना अटक

जळगाव प्रतिनिधी | मालेगावहून जळगावकडे जाणार्‍या ट्रकमधून तब्बल ४२ लाख ५४ हजार रूपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, एम.एच-१५,जीव्ही-९७४१ या क्रमांकाच्या ट्रकमधून गुटख्याचा साठा मालेगाव येथून चाळीसगावमार्गे जळगावला नेण्यात येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या अनुषंगाने पोलिसांनी चाळीसगाव चौफुलीच्या जवळ हा ट्रक अडवून याची तपासणी केली. तेव्हा यात गुटखा, सुगंधीत तंबाखू आदींचा समावेश असलेला माल मिळून आला याचे मूल्य सुमारे ४२ लाख ५४ हजार असून पोलिसांनी हा माल जप्त केला. यासोबत ट्रक देखील जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी ट्रकचालक शेख हारून शेख हुसेन (वय ४८, रा. आझादनगर, मालेगाव) आणि क्लिनर मोहंमद शमीम मोहंमद सलीम (वय १९, रा. मालेगाव) या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, इतक्या मोठ्या प्रमाणात गुटखा पकडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

Protected Content