मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत तात्काळ राजीनामा द्यावा, तसेच देशातील परीक्षा व्यवस्था अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्यासाठी व्यापक शैक्षणिक सुधारणा तातडीने राबविण्यात याव्यात, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीसह मुक्ताईनगर तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांनी केली. या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत शासनाला सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शिक्षण व्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास डळमळीत झाला आहे. अशा गंभीर घटनेची नैतिक व कायदेशीर जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ पदाचा राजीनामा द्यावा. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्थेत कठोर, प्रभावी आणि पारदर्शक सुधारणा करणे अत्यावश्यक असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांसाठी सुरू केलेल्या आमरण उपोषणात सरकारने हस्तक्षेप करून त्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध ताब्यात घेत रुग्णालयात दाखल केल्याचा आरोप संघटनांनी केला. शांततापूर्ण आणि अहिंसक आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार असून अशा आंदोलनावर बळाचा वापर करणे लोकशाही मूल्यांच्या विरोधात असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले.

संघटनांनी १८ जुलै २०२६ रोजी जंतर-मंतर येथे घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध नोंदवित संबंधित कारवाईची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. तसेच या प्रकरणातील जबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य कारवाई करण्यात यावी आणि आंदोलनकर्ते सोनम वांगचुक यांच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण करण्यात यावे, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली. याशिवाय नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाची पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, देशातील परीक्षा प्रणाली भ्रष्टाचारमुक्त, सुरक्षित आणि विद्यार्थ्यांचा विश्वास वाढविणारी बनविण्यासाठी व्यापक शैक्षणिक सुधारणा राबविण्यात याव्यात, अशा प्रमुख मागण्यांचाही पुनरुच्चार करण्यात आला.
निवेदन सादर करताना ॲड. सहदेव तायडे, मोहन मेढे, विश्वनाथ मोरे, समाधान गवई, वसंत लहासे, अरुण वानखेडे, लक्ष्मण भालेराव, ॲड. राहुल पाटील, लक्ष्मण चौके, रमेश बोदडे, मधुकर भोई, सुनील कोळी, अनिल सोनवणे, संभाजी पारधी, संजय धुंदले यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांनी शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी भूमिका व्यक्त केली.



