भुसावळ, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भुसावळ शहरातील तहसील कार्यालय परिसरात उभारण्यात आलेल्या सह दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण सोमवारी (दि. २०) दुपारी ४ वाजता वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले. या नव्या इमारतीमुळे नागरिकांना अधिक सुसज्ज व आधुनिक सुविधा उपलब्ध होणार असून नोंदणी प्रक्रियाही अधिक कार्यक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या लोकार्पण सोहळ्यास प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार नीता लाबळे, प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे, मंदार कुलकर्णी तसेच सह दुय्यम निबंधक नितीन सोनवणे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नव्या इमारतीमुळे नागरिकांना जलद, पारदर्शक आणि दर्जेदार सेवा देणे अधिक सुलभ होईल, असा विश्वास व्यक्त केला. शासन नागरिकाभिमुख सुविधा उभारण्यासाठी कटिबद्ध असून अशा पायाभूत सुविधांमुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल, असेही यावेळी नमूद करण्यात आले.

कार्यक्रमानंतर उपस्थितांनी नव्या इमारतीची पाहणी केली. प्रशस्त कार्यालयीन व्यवस्था, नागरिकांसाठी आवश्यक सुविधा आणि आधुनिक पायाभूत सोयींमुळे या इमारतीचे स्वागत करण्यात आले.



