Home क्राईम 12 लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह अर्टिगा कार जप्त ; दोघे ताब्यात

12 लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह अर्टिगा कार जप्त ; दोघे ताब्यात

0
31

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले असून, स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) धडक कारवाई करत १२ लाख ६ हजार ९०८ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, एक मारुती सुझुकी अर्टिगा कार आणि दोन मोबाईल फोन जप्त केले आहेत. या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

जिल्ह्यात अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना कठोर व प्रभावी कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय माहिती संकलित केली जात होती. दरम्यान, १७ जुलै २०२६ रोजी गोपनीय बातमीदारामार्फत मारुती सुझुकी अर्टिगा (एमएच-३० एझेड-४६६४) या वाहनातून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुक्ताईनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचून संशयित वाहन अडवले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्रात विक्री व वाहतुकीस प्रतिबंधित असलेला विविध कंपन्यांचा गुटखा आढळून आला. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. त्यांच्या उपस्थितीत पंचनामा करून संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाईत ३ लाख ८६ हजार ९०८ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, ८ लाख रुपयांची मारुती सुझुकी अर्टिगा कार आणि २० हजार रुपये किमतीचे विवो कंपनीचे दोन मोबाईल फोन असा एकूण १२ लाख ६ हजार ९०८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सय्यद आरिफ सय्यद हकीम (नदीम, वय ३५, रा. पिंपळगाव राजा, ता. खामगाव, जि. बुलढाणा) आणि खलील उल्ला खान (वय ३२, रा. शेगाव रोड, खामगाव, जि. बुलढाणा) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास मुक्ताईनगर पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, पोलीस नाईक हेमंत पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल रतन गिते यांच्या पथकाने केली. या पथकाने केलेल्या अचूक नियोजनामुळे अवैध गुटखा वाहतुकीचा मोठा प्रयत्न हाणून पाडण्यात यश आले. दरम्यान, जिल्ह्यात अवैध गुटखा विक्री व वाहतुकीविरोधातील मोहीम यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्पष्ट केले आहे. अंमली पदार्थमुक्त आणि गुन्हेमुक्त समाज घडविण्यासाठी नागरिकांनीही पोलिसांना संशयास्पद हालचालींची माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.


Protected Content

Play sound