चाळीसगाव, प्रतिनिधी । शहरातील उत्पन्न बाजार समितीच्या आवारात किंवा बक्कळ जागेवर हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, या आशयाची मागणी बंजारा समाज बहुउद्देशीय संस्थेतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अर्थात हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांचा पूर्णाकृती पुतळा चाळीसगाव शहरात व्हावे, यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून बंजारा समाज बहुउद्देशीय संस्थेकडून प्रयत्न हे सुरूच होते. दरम्यानच्या काळात कोरोनाने हाहाकार माजवल्याने या मागणीला कुठेतरी ब्रेक लागला होता. परंतु परिस्थिती आता पुर्ववत होत असल्याने बंजारा समाज बहुउद्देशीय संस्थेने या मागणीकडे सर्वांचे लक्ष वेधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. उन्मेष पाटील, आ. मंगेश चव्हाण, माजी आ. राजीव देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
दरम्यान आमदार मंगेश चव्हाण यांनी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जागा उपलब्ध होण्यासाठी सचिव सतिशराजे व मुख्य प्रशासक दिनेश पाटील यांना पत्र देणार असल्याचे सांगून पूर्णाकृती पुतळा हा स्व: खर्चाने बांधून देण्याची ग्वाही दिली. तसेच वसंतराव नाईक यांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा, यासाठी सर्व पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. निवेदनावर बंजारा समाज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष योगेश्वर राठोड, ग्लोबल बंजारा अस्तित्व फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक राठोड, कवी गोरख गोफणे रुपसिंग जाधव, सुनील राठोड, शेतकरी बचाव कृती समितीचे सचिव भीमराव जाधव, माजी चेअरमन दिनकर राठोड, राजू चव्हाण, कोमलसिंग जाधव, प्राणी मित्र इंदल चव्हाण, अॅड.भरत चव्हाण आदींच्या सह्या आहेत.