अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य महामार्गाचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गात करण्याची मागणी

नवी दिल्ली । अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य महामार्गाचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गात करण्यात यावे, अशा मागणीचे खासदार रक्षाताई खडसे यांनी रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदन पाठवले आहे. 

अंकलेश्वर-बऱ्हाणपूर हा रावेर लोकसभा क्षेत्रातील शेती पट्ट्यातील अत्यंत महत्वपूर्ण मार्ग असून  गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश राज्यातील वाहतूक सुरू असते. केळी व कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्याने या मालाची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. निधीची कमतरता भासत असल्यामुळे नियमित दुरुस्ती व देखभाल होत नाही. ज्यामुळे रस्त्याची दुर्दशा होत आहे. गंभीर अपघात झाल्यामुळे जीवितहानी सोबत मालाचे नुकसान होते. खराब रस्त्यांमुळे वाहनांचे नुकसान होते आहे.  हा राज्य महामार्ग जर राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्यात आल्यास केंद्राकडून नवीन पद्धतीने व आधुनिक मशिनरीच्या साहाय्याने चौपदरीकरण बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध होईल. 

हे निवेदन रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयचे सचिव गिरधर अरमाने यांनी स्वीकारले व अंकलेश्वर – बऱ्हाणपूर राज्य महामार्गाचे अवलोकन करून कमीत कमी दोनपदरी सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचे आश्वासन  खासदार रक्षाताई खडसे यांना दिले.

Protected Content