आम्ही भाजपा नेत्यांना ‘चंपा’ किंवा ‘टरबुज्या’ म्हणणार नाही — नाना पटोले

 

पुणे : वृत्तसंस्था । भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला काहीही म्हटले तरी, आम्ही भाजपा नेत्यांना चंपा किंवा टरबुज्या म्हणणार नाही, ती आमची संस्कृती नाही , असे प्रत्युत्तर आता नाना पटोले यांनीं दिले आहे .

राज्यातील सत्ता गेल्यापासून भाजपाचे नेते सैरभेर झालेले आहेत. केंद्राच्या मदतीने राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचे सगळे प्रयत्न विफल झाल्याने आता त्यांचा तोल ढासळला आहे. चंद्रकांत पाटलांना तेलकट थापा मारून केंद्राचे अपयश आणि मराठा, ओबीसी समाजाच्या फसवणूकीचे पाप झाकता येणार नाही.” असे प्रत्युत्तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटल यांना दिले आहे.

 

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल पुण्यात बोलताना नाना पटोले यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना, “नाना पटोले हे पप्पू आहेत. केंद्रात जसे एक पप्पू आहेत, तसेच महाराष्ट्रात देखील एक पप्पू आहेत. ते त्यांच्या तोंडाला येईल ते बोलत असतात”, असं म्हटलं होतं.

 

नाना पटोले म्हणाले की, “केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. गेल्या आठ महिन्यांपासून केंद्र सरकारने आणलेल्या तीन काळ्या कायद्यांविरोधात देशाच्या राजधानीच्या वेशीवर हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत.  कोरोना महामारी आटोक्यात आणण्यासाठी मोदी सरकारकडे काही ठोस धोरण नाही. लसीकरण मोहिमेचा बोजवारा उडालेला आहे. गंगेच्या पात्रातून वाहणारे मृतदेह हजारे जगभरातील माध्यमांनी दाखवल्यामुळे मोदी सरकारच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. मोदी सरकारने केंद्रीय आरोग्यमंत्री आणि पेट्रोलियम मंत्री बदलून मोदींनी आपल्या अपयशाची कबुलीच दिली आहे. पण चंद्रकांत पाटलांसारखे बोलघेवडे विरोधी पक्षांच्या नेत्यांवर टीका करून मोदी सरकारचे अपयश झाकण्याचा प्रयत्न करत आहेत.”

 

“चंद्रकांत पाटलांनी आमच्यावर कितीही खालच्या पातळीवर जाऊन टीका करावी. त्यांनी आम्हाला कितीही हिणवले तरी आमची हरकत नाही, त्यांनी आमच्यावर केलेल्या टीकेमुळे पेट्रोल, डिझेल व जीवनाश्यक वस्तूंचे दर कमी होणार असतील, देशातील सर्व नागरिकांना मोफत कोरोना प्रतिबंधात्मक लस मिळणार असेल. मोदी सरकारने आणलेले तीन शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द होणार असतील. केंद्र सरकारने जाणिवपूर्वक कोर्टाच्या माध्यमातून रद्द केलेले मराठा आणि ओबीसी आरक्षण मिळणार असेल तर चंद्रकांत पाटलांच्या टीकेचे स्वागतच आहे.” असं देखील नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

 

“नितीन गडकरी यांच्या कारखान्याची चौकशी करण्याची मागणी अमित शाह यांच्याकडे करून चंद्रकांत पाटील गडकरींचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न करत असतील. पण आमचा आवाज ते बंद करू शकणार नाहीत.  आम्ही देशातील गरीब, कष्टकरी जनता व शेतक-यांच्या न्याय हक्कांसाठी आवाज उठवत राहू. ईडी सीबीआयचा वापर करून मोदी शाह आमचा आवाज बंद करू शकले नाहीत. त्यामुळे चंद्रकांत पाटलांनी पोपटपंची करण्यापेक्षा केंद्राने जाणिवपूर्णक अडवून ठेवलेले मराठा आणि ओबीसी आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत.” असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत.

 

Protected Content