मोकाट गुरांच्या मालकांवर कार्यवाही करण्याची मागणी

धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील “शिवराणा ग्रूपतर्फे” मोकाट जनावरांच्या मालकांवर कार्यवाही करण्यासंदर्भात मुख्याधिकारी व तहसिलदार धरणगाव यांना निवेदन देण्यात आले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सध्या लम्पी रोगाच्या प्रादुर्भावामुळे गावात व परिसरात गायी आणि गोवंश मधील जनावरांचा करूण रित्या अंत होतोय. गावातील अनेक पशुधन वागवणाऱ्या धन्यांनी आपापले पशुधन मोकाट सोडून जबाबदारी पूर्णपणे झुगारून दिली आहे. अशा परिस्थितीत लसीकरण न झाल्यामुळे अनेक गायी, वासरे व पशुधनाचा दुर्दैवी अंत होतोय, हे सर्व बघून गावातील तरुण व्यथित झाले आहेत. अतिशय दुःखी आणि कष्टी अंतःकरणाने त्यांनी अनेक गोमाता व वासरांचे विधिवत अंत्यसंस्कार केले. गाय मृत्युमुखी पडल्यानंतर मूळ मालक त्या ठिकाणी यायला देखील तयार नाहीत यामुळे गावातील तरुण खूप संतापलेले आहेत. गायींचे व इतर पशुधनाचे लसीकरण पूर्ण करण्यात यावे यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी यांना तसेच मोकाट जनावरांच्या मालकांवर कठोर कार्यवाही करण्यात यावे यासाठी मुख्याधिकारी व तहसिलदार धरणगाव यांना “शिवराणा ग्रुपच्या” वतीने निवेदन देण्यात आले. याप्रसंगी सर्व तरुणांनी आपल्या भावना व्यक्त करतांना सांगितले की, जर गुरांचा त्यांच्या घरासमोर मृत्यू होत असेल तर काहीच हरकत नाही परंतु गावात कुठेतरी गुरे दगावली व तद्नंतर त्यांचे मालक अनुदान मिळवण्यासाठी धडपड करत असतील तर त्यांना ते देण्यात येऊ नये; अशा संतप्त भावना सर्व युवकांनी व्यक्त केल्या.

याप्रसंगी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.पी. व्ही. सोनोने, न.प.कार्या. अधीक्षक संजय मिसर, तहसिलदार नितीनकुमार देवरे यांना “शिवराणा ग्रुपचे” जितेंद्र सुभाष पाटील (महाराज) व प्रथम भरतसिंह सूर्यवंशी यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. यावेळी पत्रकार पी.डी.पाटील सर, अँड. हर्षल चव्हाण, आकाश तिवारी, संजय ओस्तवाल, पंकज पाटील, राहुल पाटील, पप्पू पाटील, भावेश झुंजारराव, दिनेश भदाणे, विक्रम पाटील, नामदेव मराठे, प्रा. रविंद्र मराठे, वसंत माळी, सुनिल चौधरी, लक्ष्मणराव पाटील, सागर पाटील, राहुल धनगर, डॉ. वाल्मीक पाटील, डॉ. प्रदीप पवार, एन.जी. गोतरणे यांच्यासह “शिवराणा ग्रुपचे” अनेक सदस्य, धरणगावातील सुज्ञ नागरिक आणि शेतकरी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

Protected Content